मतदारसंघासाठी बंडखोर गटात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dnyanraj Chowgule

मतदारसंघासाठी बंडखोर गटात

उमरगा, (जि. उस्मानाबाद) - उमरगा - लोहारा मतदारसंघाचे शिवसेनेचे बंडखोर आमदार ज्ञानराज चौगुले यांनी आठ दिवसांनंतर ऑनलाइन संवाद साधत प्रथमच प्रतिक्रिया देताना, कुणाच्याही दबावाला बळी न पडता स्वविचाराने गुवाहाटीत आलो, असे सांगितले. मतदारसंघाच्या विकासासाठी हे पाऊल उचलल्याचेही ते म्हणाले.

दरम्यान, ‘राजकीय गुरू प्रा. रवींद्र गायकवाड, गटनेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाने गुवाहाटीत आलोय, हे त्यांनी उच्चारलेले वाक्य मतदारसंघातील नागरिक, शिवसैनिकांना बुचकाळ्यात टाकणारे आहे. त्याची वेगवेगळ्या अर्थाने चर्चा केली जात आहे.

उमरगा-लोहारा मतदारसंघातून चौगुले तीनवेळा निवडून आले आहेत. मतदारसंघात त्यांच्याविषयी नेहमी सहानभुती राहिली आहे. शिंदे यांच्या बंडात ते सामील झाल्याची घटना मतदारांना विशेषतः शिवसैनिकांना धक्का देणारी होती. चौगुलेंसारख्या संयमी, निष्ठावंत शिवसैनिकांकडून हे शक्यच नाही, अशी सुरवातीला भावना होती. मात्र त्यांच्या शिंदे निष्ठेला पुष्टी देणाऱ्या अनेक बातम्या, घटना समोर आल्याने त्यांच्या बंडावर शिक्कामोर्तब झाले.

संभ्रमानंतर खुलासा

आमदार ज्ञानराज चौगुले यांनी संवाद साधताना प्रा. रवींद्र गायकवाड व एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाने आलो, असे वक्तव्य केल्याने शिवसैनिकांत गुवाहाटीच्या प्रवासात प्रा. गायकवाड यांच्याविषयीबद्दल संभ्रम झाला होता. तो दूर करण्यासाठी चौगुले यांनी उशिरा व्हिडिओद्वारे खुलासा करताना प्रा. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाने आतापर्यंतचा राजकीय प्रवास झाला, असे म्हटले आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून आमदार ज्ञानराज चौगुलेंनी प्रसारित केलेल्या पोस्टशी माझा काही संबंध नाही. ते त्यांचे वैयक्तिक मत आहे. त्यांनी घेतलेल्या निर्णयाशी माझा दुरान्वये संबंध नाही. ३५ वर्षांपासून शिवसेनेचे एकनिष्ठेने काम केले आहे, करीत आहे, यापुढेही करणार आहे.

- प्रा. रवींद्र गायकवाड, माजी खासदार.

मतदारसंघातील नागरिकांचा आमच्यावर विश्‍वास : शिरसाट

औरंगाबाद - आम्ही सर्वजण येथे स्वखुशीने आलो असून, कोणीही आमच्या संपर्कात नाही. मतदारसंघातील नागरिकांचा आमच्यावर विश्‍वास आहे. आमच्याविषयी अफवा पसरविल्या जात आहेत, असा आरोप शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे.

जिल्ह्यातील शिवसेनेच्या पाच आमदारांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे शिवसेनेतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देत व बंडखोरांच्या विरोधात आंदोलने केली जात आहेत. बंडखोर आमदारांपैकी काहीजण आमच्या संपर्कात असल्याचा दावा देखील केला जात आहे. या पार्श्‍वभूमीवर शिरसाट यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसारित केला आहे, त्यात म्हटले आहे, की आमच्यातील कोणीही नाराज नाही. ज्या अफवा पसरविल्या जात आहेत त्या चुकीच्या आहेत. आम्ही दोन तीन दिवसांत मुंबईला येणार आहोत. अफवांवर कोणी विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले.

Web Title: In Rebel Group For Constituency Mla Gyanraj Chowgule

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top