नुकसान भरपाईच्या निधीत वाढ

कृष्णा जोमेगावकर
Friday, 22 November 2019

जिल्ह्याला मागणी केलेल्या ४३१ कोटी रुपयांत ७६ कोटींची वाढ करून ५०७ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. या बाबत जिल्हा प्रशासनाने नियोजनही केले आहे. 

नांदेड : परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नव्या दरानुसार हेक्टरी आठ हजार रुपये मिळणार आहेत. यामुळे जिल्ह्याला मागणी केलेल्या ४३१ कोटी रुपयांत ७६ कोटींची वाढ करून ५०७ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. या बाबत जिल्हा प्रशासनाने नियोजनही केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे खरिपातील कोरडवाहू, बागायती व बहुवार्षिक अशा एकूण सहा लाख ४८ हजार ३१६ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले. यात सात लाख १८ हजार ४३६ शेतकऱ्यांना फटका बसल्यामुळे त्यांना ‘एनडीआरएफ’च्या प्रचलित निकषानुसार हेक्टरी सहा हजार ८०० प्रमाणे दोन हेक्टरपर्यंत भरपाईसाठी शासनाकडे ४३० कोटी ९९ लाख रुपयांची मागणी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी केली होती.

दरम्यानच्या काळात राज्यपालांनी हेक्टरी मदतीत एक हजार दोनशे रुपयांची वाढ करून कोरडवाहू व बागायतीसाठी पिकांसाठी आठ हजार रुपये, तर बहुवार्षिक फळपिकांसाठी १८ हजार प्रतिहेक्टर देण्याची घोषणा केली होती. यामुळे जिल्हा प्रशासनाला शेतकऱ्यांना भरपाइ देण्यासाठी ४३१ कोटींच्या निधीत ७६ कोटींची वाढ करून नव्या दरानुसार ५०६ कोटी ९५ लाख २२ हजार रुपयांची आवश्यकता लागणार आहे. या निधीचे नियोजन करून शासनाकडे मागणी केली जाणार आहे.

आठ लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी
जिल्ह्यात यंदा आठ लाख तीन हजार ५१० हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली होती. या पेरणी क्षेत्रापैकी तब्बल सहा लाख ४८ हजार ३१६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले होते. यात कोरडवाहू क्षेत्राचे सहा लाख ४८ हजार ७८, बागायती ६१ व बहुवार्षिक फळपिकांचा १७७ हेक्टरचा समावेश आहे.

नव्या दरानुसार ७६ कोटींची वाढ
जिल्ह्यात नुकसानीचा फटका सात लाख १८ हजार ४३६ शेतकऱ्यांना बसला आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ‘एनडीआरएफ’च्या निकषानुसार दोन हेक्टरपर्यंत भरपाई देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे ४३० कोटी ९९ लाख ८० हजार तीनशे रुपयांची मागणी केली होती. यात कोरडवाहूसाठी ४३० कोटी ५९ लाख ७० हजार आठशे, बागायतीसाठी आठ लाख २३ हजार पाचशे रुपये, तर बहुवार्षिक फळपिकांसाठी ३१ लाख ८६ हजार रुपयांचा समावेश होता. परंतु, नव्या दरानुसार आता काेरडवाहू व बागायतीसाठी हेक्टरी आठ हजार रुपयांनुसार एकूण ५०६ कोटी ६३ लाख ३६ हजार रुपये लागणार आहेत. तर बहुवार्षिक फळपिकांसाठी हेक्टरी १८ हजार रुपयांनुसार ३१ लाख ८६ हजार रुपये लागणार आहेत. ही मदत दोन हेक्टरपर्यंत देण्यात येणार असल्यामुळे जिल्हा प्रशासनाला नव्या दरानुसार नियोजन करावे लागणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Increase in compensation funds