रब्बीसह उन्हाळीमध्ये लागवड क्षेत्रात वाढ....कुठे ते वाचा

कृष्णा जोमेगावकर
मंगळवार, 21 एप्रिल 2020

कंधार तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ८१५ मिलीमीटर  आहे. २०१९ या वर्षात एकूण पर्जन्यमान एक हजार १५७ मिलीमीटर म्हणजेच वार्षिक सरासरीच्या तुलनेत १४२ टक्के झाले होते. गतवर्षी याच काळात ७५५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती.

नांदेड : कायम दुष्काळी अवर्षण प्रवण म्हणुन कंधार तालुक्याकडे पाहिले जाते. परंतु मागील पावसाळ्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे या तालुक्यात रब्बीसह उन्हाळी हंगामात लागवडी खालील पिकांच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांत समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
   
वार्षिक सरासरीच्या तुलनेत १४२ टक्के पाऊस
कंधार तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ८१५ मिलीमीटर  आहे. २०१९ या वर्षात एकूण पर्जन्यमान एक हजार १५७ मिलीमीटर म्हणजेच वार्षिक सरासरीच्या तुलनेत १४२ टक्के झाले होते. गतवर्षी याच काळात ७५५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. सरासरीच्या फक्त ९४ टक्के होती.
 
हेही वाचा.....‘आरोग्य सेतू ॲप’ कशासाठी आहे आवश्यक ते वाचा

खरीपाच्या अंतिम टप्प्यात सरासरीच्या तिप्पट पाऊस
खरीप हंगामाच्या अंतिम टप्प्यात माहे ऑक्टोबर महिन्यात सरासरी पावसाच्या  तिप्पट पाऊस झाला.या महिन्यात तब्बल १९४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पावसाळा लांबल्याने व ऑक्टोबर महिन्यात भरपूर पाऊस झाल्याने, हातातोंडाशी आलेल्या खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले. एकीकडे हे नुकसान होत असताना या पडलेल्या पावसामुळे तालुक्यातील लघु व मध्यम प्रकल्प तुडुंब भरले.

हेही वाचलेच पाहिजे.....एकच्या आत घरात.....कोणासाठी बजावले आदेश ते वाचा

जलयुक्त शिवारच्या कामामुळे फायदा
या सर्वांचा परिणाम होऊन जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत झालेल्या विविध उपचारांमुळे पडलेल्या पावसाचे पाणी विकेंद्रीत स्वरूपात जमीनीत मुरले व जिरले. याचा परिणाम होऊन पाणी पातळीत वाढ झाली. विंधन विहीरीचे व सिंचन विहीरीच्या पाणी पातळीत वाढ झाली. सिंचनासाठी लघु व मध्यम प्रकल्पातील पाण्यासह, सिंचन प्रकल्पांच विंधन विहिर, विहीर, ओढे, नाले, शेततळे, सामुहिक शेततळे, उपसा सिंचन, नाला खोलीकरण केलेल्या व नव्याने तयार केलेल्या सिमेंट बंधार्यातील पाणी या सर्व  उपलब्ध सिंचन संसाधनांचा वापर करून रब्बी, उन्हाळी हंगामातील पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर करण्यात आली. ऊस लागवड क्षेत्रातही जवळपास १५ ते २० टक्के वाढ झाली. तालुक्यातील रब्बी हंगाम पुर्णत्वाकडे असून व उन्हाळी हंगामातील पिकही अंतीम टप्प्यात आहे. येत्या पंधरवड्यात उन्हाळी पिकाच्या काढणीस सुरुवात होईल. उन्हाळी हंगामाच्या अंतिम टप्प्यातही सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध आहे.

लागवड क्षेत्रात लक्षणीय वाढ
तालुक्यातील खरीप लागवडीखाली क्षेत्र ६८ हजार हेक्टर आहे. यावर्षी खरीप हंगामात शंभर टक्के क्षेत्रावर पिकांची लागवड झाली. खरीप हंगामात अवेळी झालेल्या पावसाने झालेल्या पिक नुकसानीचा सामना करत कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात १७ हजार ८१ हेक्टरवर तर उन्हाळी हंगामात सात हजार ५९२ हेक्टर क्षेत्रावर लागवड केली. यामुळे चालू वर्षात कंधार तालुक्याची पिक घनता तब्बल १३६ टक्के झाली. रब्बीत हरभरा आणि गहू या पिकांची लागवड करण्यात आली होती. गहू आठ हजार चारशे हेक्टर, हरभरा सात हजार तीनशे हेक्टर, रब्बी ज्वारी ५५३ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी रब्बी हंगामातील पीक पेरा जवळपास तिप्पटीने वाढला.

उन्हाळी हंगामात लागवड क्षेत्रात वाढ 
भूजल पातळीत झालेली वाढ, लघु व मध्यम प्रकल्पातून उपलब्ध झालेला पाणीसाठा याचा विचार करून कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामात उन्हाळी भुईमूग, उन्हाळी ज्वारी, मका, चारा पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात केली. एकूण सात हजार ५९२ हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी पिकांची लागवड झाली आहे. यात दोन हजार सहाशे हेक्‍टर क्षेत्रावर उन्हाळी ज्वारी तर चार हजार आठशे हेक्‍टर क्षेत्रावर उन्हाळी भुईमुगाची पेरणी झाली आहे. 

कापूस पिकानंतर उन्हाळी पिकांची लागवड 
कंधार तालुक्यातील खरीप हंगामातील प्रमुख पिक कापूस असून रब्बी व उन्हाळी पिकासाठी पुरेसं सिंचन उपलब्ध न झाल्यास खरीपातील कापूस फडदर म्हणून ठेवण्यात येतो. मागील काही वर्षांत गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे फडदर कापूस न घेण्याबाबत कृषी विभागाकडून जनजागृती करण्यात आली. त्यात यशही मिळाले. यावर्षी सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध झाल्याने खरीप हंगामातील कापूस पिकाची डिसेंबर अखेर काढणी करून अशा काढणी झालेल्या क्षेत्रात शेतकरी बांधवांनी उशिराची ज्वारी, भुईमूग व उन्हाळी ज्वारीचे पिकाची लागवड केली. 

उन्हाळी सोयाबीनकडेही वळले शेतकरी
कंधार तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांकडे पशुधन आहे. खरीप हंगामात अवेळी पडलेल्या पावसामुळे ज्वारी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन ज्वारीची प्रत खालावली. या खालावलेल्या प्रतीच्या ज्वारीमुळे व पशुधनासाठी लागणाऱ्या चाऱ्यामुळे कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांनी उन्हाळी ज्वारी या पिकाच्या लागवडीला प्राधान्य दिले. तसेच उन्हाळी भुईमूग या पासूनही नगदी उत्पादनासह चारा मिळत असल्याने भुईमूग पिकाच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल दिसून आला. उशीर झालेल्या पावसामुळे काही भागातील सोयाबीन या पिकाची  प्रत खालावली अनेक शेतकरीबांधव सोयाबीन पेरणीसाठी घरचे बियाणे वापरतात परंतु यावर्षी अवेळी झालेल्या पावसामुळे सोयाबीनच्या प्रतीवर परिणाम झाला व त्यामुळे पेरणीसाठी घरचे बियाणे उपलब्ध व्हावे या दृष्टीने उन्हाळी सोयाबीनची सुद्धा लागवड करण्यात आली. मोठ्या प्रमाणावर लागवड झाली.

हंगामातील लागवड क्षेत्रात नवीन विक्रम
उन्हाळी हंगामात पिकाच्या लागवडीवर भर दिला आहे. तब्बल सात हजार ५९२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी करत उन्हाळी हंगामातील लागवड क्षेत्रात नवीन विक्रम प्रस्थापित केला. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला गारपीटग्रस्त भागातील काही क्षेत्र वगळता उर्वरित भागातील उन्हाळी भुईमूग उन्हाळी ज्वारी या पिकांची पिकपरिस्थिती अतिशय समाधानकारक असून जोमदार वाढीसह किड व रोग मुक्त आहे. येत्या आठवड्यात या दोन्ही पिकांची काढणीस सुरुवात होईल.  चांगली उत्पादकता मिळेल.

कृषी विभाग खरीप हंगामाच्या तयारीत
नुकतच हवामान खात्याने यावर्षीचा पावसाचा अंदाज व्यक्त केला. या वर्षी सरासरी एवढा पाऊस पडणार असल्याचे भाकीत केले आहे. कृषी विभागासाठी ही आनंदाची बातमी आहे. सुरुवात चांगली होईल असे चित्र दिसते. या वर्षी धान्य उत्पादनाचा सुद्धा विक्रमी लक्षांक ठेवण्यात आलेला आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन कृषी विभागामार्फत खरीप हंगामाची तयारी मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. खरीप हंगामासाठी लागणारे बियाणे लागणारे खत यांचे योग्य नियोजन करून शेतकऱ्यांना दर्जेदार निविष्ठाचा योग्य वेळी पुरवठा होईल यावर भर दिला जातो आहे.

घरच्या सोयाबीन बियाणेची उगवण क्षमता तपासावी
खरीपाची पूर्वतयारी करताना स्वतःच्या शेतातील साठवुन ठेवलेल्या सोयाबीनची उगवणक्षमता तपासून घ्यावी. मागील वर्षी खरीप सोयाबीन काढणी करतेवेळी अवेळी झालेल्या पावसाने पिकाची गुणवत्ता खालावली. त्यामुळे उपलब्ध असलेले बियाणेची उगवणक्षमता किती आहे, हे तपासून बघणे गरजेचे आहे. सोयाबीनचे बियाणेची प्रत्येक वर्षी बियाणे बदल करण्याची गरज नसते. बियाणेची  उगवणशक्ती ७० टक्के असेल तर असे बियाणे पेरणीसाठी योग्य आहे. या पेक्षा उगवण कमी असेल तर एकरी पेरणीसाठी लागणाऱ्या बियाण्यात त्या प्रमाणात वाढ करून जास्तीचे बियाणे वापरून पेरणी करावी. बियाण्यास पेरणीपुर्वी बिजप्रक्रिया करावी. सोयाबीन रूंद सरी वरंबा (बीबीएफ) पद्ध्तीने पेरावे. या पद्धतीने पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना किमान २० टक्के उत्पादन जास्त मिळते. कोवीड विषाणू व लॉकडाऊनच्या काळात योग्य काळजी घेत शेतकऱ्यांना विविध माध्यमांतून मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विभागाकडून नियोजन करून अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

- रमेश देशमुख,
(तालुका कृषी अधिकारी, कंधार जि. नांदेड)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Increase in planting area in summer with rabbi .... read it where