प्रकल्पांतील जलसाठ्यात वाढ

अब्बास सय्यद
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

परतीच्या पावसामुळे भूम तालुक्‍याला मोठा आधार 

भूम (जि. उस्मानाबाद) : ऑक्‍टोबर महिन्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने तालुक्‍यातील विविध प्रकल्पांतील पाणीपातळीत वाढ झाली आहे. काही तलाव ओव्हरफ्लो झाल्याने पुढील पाण्याची चिंता मिटल्याचे दिसत आहे. तालुक्‍यात एकूण आठ लघुप्रकल्प, तीन मध्यम तर चार साठवण तलाव आहेत. या प्रकल्पांतील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली. 

यंदा जून ते सप्टेंबरदरम्यान पावसाचे प्रमाण अगदी अल्प राहिल्याने तालुक्‍यात दुष्काळी परिस्थिती कायम होती. अनेक गावांना 35 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला होता तर जनावरांसाठी 50 चारा छावण्या सुरू होत्या. ऑक्‍टोबरमध्ये परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने तालुक्‍यातील नद्या, ओढे व नाले खळखळून वाहू लागले. त्यामुळे लघुप्रकल्प, मध्यम प्रकल्प व साठवण तलावात पाणीपातळी वाढली. परतीचा पाऊसच झाला नसता तर पिण्याच्या पाण्यासह जनावरांचे हाल झाले असते. 
वाकवड, कुंथलगिरी हे साठवण तलाव भरले आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. 

हेही वाचा ः मूल संकटात असेल, तर काय करावे?

सध्याचा पाणीसाठ्याची टक्केवारी अशी : ईट येथील संगमेश्वर मध्यम प्रकल्प- 57, वाकवड साठवण तलाव- 100, गिरलगाव साठवण तलाव- 100, घुलेवाडी साठवण तलाव- 100. पाथरूड लघुप्रकल्पात 1.566 टक्केच पाणीसाठा झाला आहे. बागलवाडी लघुप्रकल्पात अद्यापही जोत्याखाली पाणीपातळी आहे. हिवर्डा, जांब लघुप्रकल्पात शून्य टक्के पाणीसाठा आहे. तिंत्रज लघुप्रकल्पात 31.574 टक्के, उमाचीवाडी साठवण तलावात 1.067 टक्के, बाणगंगा मध्यम प्रकल्पात 61.120 टक्के, रामगंगा मध्यम प्रकल्पात 64.887 टक्के पाणीसाठा झाला आहे. भूम व वाशी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या आरसोली मध्यम प्रकल्पात 52.250 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. कुंथलगिरी लघुप्रकल्प शंभर टक्के भरला आहे. गिरवली, बेलगाव व चिंचपूर येथील तलावातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे तर कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यातही पाणीसाठा उपलब्ध आहे. 

हेही वाचा - राजकीय चर्चेत वाद, मित्राचा तोडला कान

तरीही काटकसर हवीच 
तलाव परिसरातील शेतीसाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा केला जातो. वारेमाप उपसा टाळण्यासाठी पाटबंधारे विभागाने निर्बंध घालावेत. काही तलावांतून कालव्याद्वारे पाणी सोडून शेतीला दिले जाते. त्यावेळी होणारा अपव्यय टाळण्यासाठी प्रयत्न व्हावेत, पाण्याचे योग्य नियोजन व्हावे, काटकसरीने वापर व्हावा यादृष्टीने आतापासूनच जागृती व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

परतीच्या पावसामुळे भूम तालुक्‍यातील नदी, नाले अजूनही वाहते आहेत. त्यामुळे तलाव व अन्य स्रोतांतील जलसाठा आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. 
- पी. एस. घोडके, उपअभियंता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Increase in water resources