Independence Day- कोरोनाबाधितांना आता घरात राहून घेता येणार उपचार- पालकमंत्री नवाब मलिक 

गणेश पांडे
Saturday, 15 August 2020

कोणतेही लक्षणे नसणाऱ्या रुग्णांना आता स्वताच्या घरी राहूनही उपचार घेता येणार आहेत, अशी माहिती पालकमंत्री नवाब मलिक यांनी शनिवारी (ता.१५) पत्रकार परिषदेत दिली.

परभणी ः कोरोना विषाणुचा संसर्गाचे पॉझिटीव्ह निदान झालेल्या पण कोणतेही लक्षणे नसणाऱ्या रुग्णांना आता स्वताच्या घरी राहूनही उपचार घेता येणार आहेत, अशी माहिती पालकमंत्री नवाब मलिक यांनी शनिवारी (ता.१५) पत्रकार परिषदेत दिली. तसेच जिल्ह्यातील कोरोनासंदर्भात वॉररुम उघडणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.

पालकमंत्री मलिक यांनी शनिवारी (ता.१५) कोरोना आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी झालेल्या निर्णयाची माहिती पत्रकारांना दिली. यावेळी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, जिल्हा पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी., जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शंकरराव देशमुख यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

कोरोनाबाधितांना आता होम अॅसोलेशन

सध्याच्या स्थितीत कोरोनाबाधितांचा आकडा हा राज्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत फारसा नसला तरी आगामी दोन महिन्यात परिस्थिती चिंताजनक उद्भवू शकते. या दृष्टीने आगामी 15 दिवसांत प्रशासकीय यंत्रणेत मोठी वाढ करून स्वॅब टेस्टींगचे प्रमाण वाढविले जाणार आहेत. त्याच बरोबर कोरोनाबाधितांना ज्या घरी स्वतंत्र रूम, रूमला जोडून स्वच्छतागृह आहे. अशा ठिकाणी होम आयसोलेशन केले जाणार आहे. अशा रुग्णांवर टेलीमेडीसीनच्या माध्यमातून तज्ञ वैद्यकीय अधिकारी सातत्याने लक्ष ठेवतील. त्याच बरोबर डेडिकेटेड वार रूममधून अशा रुग्णांसाठी सातत्याने आरोग्य सेवा पुरविली जाणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.

खासगी रुग्णालयाचे दर निश्चित

खासगी रुग्णालयातूनसुध्दा जीवनदायी योजनेतून रुग्णांना लाभ दिला जात आहे. खासगी रुग्णालयात औषधोपचाराचे दरसुध्दा निश्रि्चत करण्यात आले आहेत. भविष्यातील वाढती संख्या लक्षात घेऊन प्रशासनाने यंत्रणा सुसज्ज करण्याकरिता लक्ष केंद्रित केले आहे. स्बॅब टेस्टिंग टप्याटप्याने वाढविण्यात येणार आहे. कॉरंटाईन केलेल्या रुग्णांचा कालावधीसुध्दा सात किंवा 10 दिवसांचाच रहावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत असे श्री. मलिक म्हणाले.

हेही वाचा -  स्वातंत्र्यदिन : नांदेडला बनविलेला तिरंगा फडकतो सोळा राज्यांत, पण...

पान, चहा टप-यांना परवानगी

गेल्या चार महिन्यांपासून बंद असलेल्या जिल्ह्यातील चहा व पानटप-यांना शनिवारपासून मोकळीक देण्यात आली आहे. ते आपले व्यवसाय सोशल डिस्टसींगचे नियम पाळून  करू शकतील. या व्यावसायिकांनी विशिष्ट मर्यादेत राहून चार वा पाच ग्राहकांना एकावेळी सेवा द्यावी. कोणत्याही नियमांचे उल्लंघन करू नये हे नियम त्यांना पाळावे लागणार आहेत.

गंभीर आजारांच्या रुग्ण मृत्यूचे प्रमाण जास्त

जिल्ह्यात विशेषतः शहरात कोरोनाबाधीत रुग्णांच्या वाढत्या प्रमाणाबाबत प्रशासन निश्‍चीतच चिंतेत आहे. परंतू आजवर झालेले बाधितांचे मृत्यू हे प्रामुख्याने गंभीर आजार असलेल्या रुग्णांचेच असल्याची बाब समोर आली आहे. कोरोनाबाधित रुग्णांमध्ये यापुर्वी असलेले गंभीर आजार ज्यात रक्तदाब, मधुमेह, दमा या रुग्णांचाही समावेश मोठ्या संख्येने आहे. जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या 66 जणांच्या मृत्यूमध्ये या तिन्ही आजारांसह अन्य काही गंभीर आजारही रूग्णांमध्ये पुर्वी पासूनच असल्याचे दिसून आले आहे. प्रशासनाने गंभीर आजाराच्या रुग्णांना आता मॉनिटरिंग करण्याचे ठरविले आहे. असेही पालकमंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.

संपादन - प्रल्हाद कांबळे 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Independence Day- Coronation victims can now be treated at home- Guardian Minister Nawab Malik parbhani news