इंडियन ऑईलच्या पाईपलाइनसाठी तलावाची भिंत उद्ध्वस्त

Beed News
Beed News

आष्टी : इंडियन ऑईल गॅस कंपनीने पाइपलाइनसाठी तलावाची भिंत उद्‍ध्वस्त केल्याचा धक्कादायक प्रकार तालुक्यातील गांधनवाडी शिवारात घडला आहे. याबाबत तक्रार केल्यास तुमच्यावर केस करू, अशी धमकी शेतकऱ्यांना दिली जात आहे. 

आष्टी तालुक्यात २१ गावांमध्ये इंडियन ऑईल कंपनीकडून गॅस पाइपलाइनचे काम सुरू आहे. त्यासाठी २५ गावांतील ३७७ गटांतील १०३ हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात आले आहे. याच कामासाठी तालुक्यातील गांधनवाडी शिवारात गावतलावाची भिंत अक्षरशः उद्‍ध्वस्त करण्यात आली आहे. तलावाची भिंत पाडून तलावाच्या मधोमध सुमारे तीस फुटांचा रस्ता तयार करण्यात आला असून, त्यामधून कामासाठी चारचाकी वाहनांची ये-जा केली जात आहे. 

तलावाची भिंत फोडल्याबाबतची कोणतीही तक्रार या कार्यालयास प्राप्त झालेली नाही. याबाबत तक्रार आल्यानंतर संबंधित भागातील तलाठी, मंडळ अधिकारी यांच्यामार्फत योग्य ती कारवाई करण्यात येईल. 
-रमेश मुनलोड, तहसीलदार, आष्टी 

तलावाच्या भिंतीला लागून अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी, बोअर आहेत. मात्र, या रस्त्यामुळे बोअर बुजले आहेत. तसेच विहिरींचेही अंतर अवघे दोन फूट आहे. पाइप गाडण्यासाठी केलेल्या सात फुटांच्या खोदकामामुळे शेतकऱ्यांनी शेतात केलेली अंतर्गत पाइपलाइनही फुटल्या आहेत. 

दरम्यान, याबाबत शेतकऱ्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला असता, कलेक्टरच्या परवानगीने हे काम सुरू आहे. तुम्हाला जमिनीचे पैसे मिळाले, तसेच या नुकसानीचेही धनादेश मिळतील. त्यामुळे या कामाला आडवे येऊ नका, अन्यथा तुमच्यावर गुन्हे दाखल होतील, अशी धमकी कंत्राटदाराने नेमलेल्या व्यक्ती तसेच अधिकाऱ्यांमार्फत शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. 

पाटबंधारे विभाग करणार पंचनामा 

गांधनवाडी तलाव हा पाटबंधारे विभागाच्या अख्त्यारीत येत असून अभियंता देवेंद्र लोकरे यांच्याशी संपर्क साधून या प्रकाराची माहिती दिली असता, त्यांनी आमच्या विभागाकडून कंपनीने कोणतीही परवानगी घेतलेली नाही. मी कोर्टाच्या तारखेमुळे बाहेरगावी असून उद्या घटनास्थळी जाऊन पाहणी केल्यानंतर पंचनामा करण्यात येईल, असे ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. 

कंपनीचे काम करताना सर्व परवानग्या घेऊनच ते करण्यात येते. कंत्राटदाराने काही गडबड केली असल्यास उद्या आमच्या नगर येथील कार्यालयामार्फत अभियंत्याला पाठविण्यात येणार असून यानंतर प्राप्त माहितीनुसार योग्य ती खबरदारी घेण्यात येणार आहे. 
- सुनील खोडे, अधिकारी, इंडियन आईल कंपनी, नगर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com