भारताचा पाकिस्तान करण्याचा प्रयत्न : हुसेन दलवाई

माधव इतबारे
शनिवार, 21 डिसेंबर 2019

विशिष्ट एका समाजाला बाजूला ठेवून व त्रास देण्यासाठी कायदा लागू केला जात आहे. त्यामुळे देशभरात कायद्याच्या विरोधात जनक्षोभ उसळला आहे. ख्रिश्‍चन समाजाला सोबत घेता मग मुस्लिम समाजाला का टाळता? असा प्रश्‍न दलवाई यांनी केला.

औरंगाबाद : आर्थिक मंदी, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्‍न बाजूला ठेवून भाजप सरकार एनआरसी (राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी) सीएए (नागरिकत्व दुरुस्ती) लागू करून देशात दुही माजविण्याचे काम करत आहे. या देशाला पाकिस्तान करण्याचा प्रयत्न असून, घटनेला हात लावाल तर आम्ही ते खपवून घेणार नाही, असा इशारा कॉंग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी शनिवारी (ता.21) दिला. राज्यात हा कायदा लागू होणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.

पत्रकार परिषदेत दलवाई पुढे म्हणाले, की निश्‍चलीकरण, जीएसटीमुळे देशातील उद्योग बंद पडत आहेत. दोन कोटी लोकांची नोकरी गेली. देश आर्थिक संकटात असताना, त्यातून बाहेर पडण्यासाठी उपाययोजना करण्याऐवजी राष्ट्रीय नागरिकत्व कायद्याची जबरदस्तीने अंमलबजावणी केली जात आहे. या कायद्याला आमचा विरोध नाही; मात्र विशिष्ट एका समाजाला बाजूला ठेवून व त्रास देण्यासाठी कायदा लागू केला जात आहे. त्यामुळे देशभरात कायद्याच्या विरोधात जनक्षोभ उसळला आहे. ख्रिश्‍चन समाजाला सोबत घेता मग मुस्लिम समाजाला का टाळता? असा प्रश्‍न दलवाई यांनी केला.

हेही वाचा ः औरंगाबादेत शांततेचे वातावरण

पाकिस्तानात अल्पसंख्याक समाजाचा कसा छळ होतो, याचे दाखले दिले जातात. त्याप्रमाणेच आता तुम्ही देशातील गोरगरिबांना त्रास देणार आहात का? असे सांगून दलवाई यांनी देशाला पाकिस्तान करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, असा आरोप केला. आसाममध्ये एनआरसी लागू झाल्यानंतर 19 लाख लोकांकडे कागदपत्रे नसल्याचे आढळून आले. त्यातील 12 लाख हिंदू, पाच लाख मुस्लिम तर दोन लाख उर्वरित समाजाचे लोक आहेत. अनेक गोरगरिबांकडे स्वतःचे रेशनकार्डही नसते, ते पुरावे कुठून देणार? असेही दलवाई म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी योग्य भूमिका घेतली असून, हा कायदा राज्यात लागू होणार नाही, असा दावा त्यांनी केला. पत्रकार परिषदेला शहराध्यक्ष नामदेव पवार, भाऊसाहेब जगताप, मोहन देशमुख, मोहसीन अहमद, युसूफ मोकाती, महिला आघाडीच्या ऍड. सरोज मसलगे, डॉ. शहापूरकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

आघाडी सरकार  25 वर्षे टिकणार

महाराष्ट्र विकास आघाडी सरकार पाच वर्षे नव्हे तर 25 वर्षे टिकेल असा दावा दलवाई यांनी केला. भाजपने राज्यातील अनेक उद्योग गुजरातला पळविले. राज्य देशात 13 व्या क्रमांकावर फेकल्या गेले. राज्याला पुन्हा एक नंबरवर आणण्यासाठी आघाडी केली आहे, त्यामुळे पुढील 25 वर्षे आघाडी सरकार असेल. ख्रिसमसपूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे दलवाई यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India's attempt to Pakistan : Hussein Dalwai