Vadanta Foxconn : वेदांता परराज्यात गेल्याची चौकशी व्हावी; अब्दुल सत्तारांची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Abdul Sattar

Vadanta Foxconn : वेदांता परराज्यात गेल्याची चौकशी व्हावी; अब्दुल सत्तारांची मागणी

कळमनुरी : ‘‘तत्कालीन मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांच्या अवास्तव भूमिकेमुळे वेदांता प्रकल्प राज्याबाहेर गेला. या प्रकरणाची चौकशी करून कोणी काय मागणी केली, याबाबतची माहिती समोर यायला हवी. महाराष्ट्रातील जनतेलाही हा प्रकल्प राज्याबाहेर का व कसा, गेला हे समजायला हवे’’, अशी अपेक्षा राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केली.आमदार संतोष बांगर यांच्या वतीने रामचंद्र सात महाराज लमानदेव मंदिर येथे झालेल्या भाऊबीज कार्यक्रमात ते बोलत होते. खासदार श्रीकांत शिंदे, हेमंत पाटील, आमदार संतोष बांगर आदी उपस्थित होते.

सत्तार म्हणाले, ‘‘जनतेचा विश्वासघात करून तत्कालीन पक्षनेत्यांनी पक्षाची विचारधारा सोडून सत्ता मिळवली. या सत्तेत असताना झालेली घुसमट पाहून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे विचार जिवंत ठेवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी निर्णय घेतला. कमी कालावधीत मोठे निर्णय घेत शिंदे सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर मदत निधी उपलब्ध करून दिला आहे.’’खासदार शिंदे, खासदार पाटील यांनीही यावेळी विचार व्यक्त केले. बंजारा समाजातील महिलांना आमदार बांगर यांच्यावतीने साडी-चोळीचे वाटप करण्यात आले.