प्रेरणादायी : भोसी गावची सहकार्यातुन समृध्दीकडे वाटचाल 

 राजाभाऊ नगरकर.
Sunday, 20 December 2020

 सुरुवातीला दरमहा शंभर रुपये बचतीपासून सुरु झालेली बचतगटाची चळवळ आज तेरा वर्षानंतर एकत्रितपणे मासिक बचत दोन लाख रुपयापर्यंत पोचली आहे. त्यातून तात्काळ कर्जाची गरज  पुर्ण होत आहे.

जिंतूर (जिल्हा परभणी) : सकारात्मक विचार आणि सामुहिक प्रयत्न असतील तर कितीही अडचणीचा काळ असेल तरीही प्रगती थांबू शकत नाही हे तालुक्यातील भोसी येथील ग्रामवासीयांनी करून दाखवले. सुमारे तीन हजार लोकसंख्येच्या भोसी येथे सामुहीक नेतृत्व असणारी व गावाबद्दल आत्मियता असलेल्या गावकऱ्यांनी मिळून २००७ यावर्षी 'ग्रामविकास समिती' स्थापन करुन अनेक उपक्रम सुरु केले.

सुरुवातीला दरमहा शंभर रुपये बचतीपासून सुरु झालेली बचतगटाची चळवळ आज तेरा वर्षानंतर एकत्रितपणे मासिक बचत दोन लाख रुपयापर्यंत पोचली आहे. त्यातून तात्काळ कर्जाची गरज पुर्ण होत आहे.

ग्रामसमृध्दी निधी मर्यादित

बचतीची सवय व सुलभ कर्ज पुरवठ्याच्या उद्देशाने गावकऱ्यांनी सुरू केलेल्या नीधी बँकेमुळे शेतकरी व गावाच्या प्रगतीच्या मार्गातील कर्ज उपलब्धीतीची सर्वात मोठी अडचण दूर झाली. बचत व वेळेवर कर्जफेड करण्याच्या सवयीमुळे आज ही संस्था यशाच्या  वळणावर पोहोचली असल्याने गाव निश्चितच आत्मनिर्भर होईल यात शंका नाही. ठेवीदारही आम्ही आणि कर्जदारही आम्हीच एकही रुपया व्याजापोटी बाहेर जाणार नाही या भूमिकेमुळे लवकरच गावाला घेऊन जाऊ असा विश्वास संस्थेला वाटत आहे.

हेही वाचाचांगली बातमी : प्रवाशांच्या सोयीकरिता आणखी तीन विशेष गाड्या, दमरेचा निर्णय -

रोजगाराची उपलब्धी पुर्णत

शेतीवर अवलंबून असणाऱ्या कुटुंबांना जोडधंद्याकडे वळवण्यासाठी गावातच बचतगटाच्या महिला मागील पाच वर्षांपासून 'सुगंधी उटणे' व इतर वस्तू तयार  तयार करुन विक्री करत आहेत. ग्राहकांच्या उदंड प्रतिसादामुळे  उटणे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात  पोहोचले. तसेच होळीला लागणारे पर्यावरण पुरक नैसर्गीक रंग तयार करुन उत्तम दर्जाची पॅकींग करुन विक्री केले. सध्या गावातच उत्पादित होणाऱ्या शेतमालावर आधारित दालमील व तेलघाणा उभारण्याचे काम सुरु आहे.ग्रहोद्योगाद्वारे अनेक प्रकारची उत्पादने करून विक्री केली जाते. भविष्यात अशा विविध वस्तूंची निर्मिती करुन एका ब्रँडखाली विकण्याचा समितीचा मानस आहे. त्यामुळे गाव अनेक बाबतीत आत्मनिर्भर होईल.

जलसंधारण व वृक्ष लागवड 

जलसंधारण व फळझाडे लागवड याकडेही ग्रामविकास समितीने लक्ष दिले आहे.पाणी फांऊडेशनच्या माध्यमातून गावातील तरुणांनी  श्रमदान केले.आज त्याचे फळ गावाला मिळाले असल्याने  गावपरिसरातील पाणीपातळी वाढण्यास मदत झाली आहे.तसेच 

शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सामुहीक प्रयत्नातून वेगवेगळ्या प्रकारची उपयुक्त फळझाडे गावशिवारातील बांधावर लावली आहेत.त्यामुळे गावशिवार फुललेले दिसत आहे. फळपीकावर भविष्यात प्रक्रिया करण्याबाबत संस्थेचा विचार आहे.आर्थिक विकासाबरोबरच गावाची सामाजीक बांधीलकी जोपासत जिल्ह्याच्या ठिकाणी उपचार घेत असलेल्या गावातील रुग्णांना समितीतर्फे परभणी येथील 'जिजाऊ मेस' मार्फत जेवणाचे डब्बे पुरविण्याची व्यवस्था केली जाते.

येथे क्लिक करासाहेब आमच्यासगट बैल पण उपाशी हाईत -

इतर उपक्रम 

या बरोबरच अभ्यासिका,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती निमीत्त आॅनलाईन परीक्षा,अर्सेनिक ३० व मास्क वाटप असे अनेक उपक्रम सुरु असतात.

भविष्यातील नियोजन

संस्थेचा विस्तार करुन अनेक गावांना जोडणे, फळबागेला प्रोत्साहन देणे,गावात शासनाच्या मदती शिवाय सुसज्ज वाचनालय व अभ्यासिका उभारणे, लघुउद्योगांना चालना देणे याबाबत नियोजन आहे.

 

संपादन-  प्रल्हाद कांबळे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inspirational: Bhosi village's journey towards prosperity through cooperation parbhani news