गंगापूर साखर कारखाना प्रकरणात तिघांचा अंतरिम जामीन फेटाळला, अंतिम सुनावणी आठ डिसेंबरला!

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 2 December 2020

१५ कोटी ७५ लाख रुपयांचा अपहार : आठ डिसेंबरला अंतिम सुनावणी 

वैजापूर (औरंगाबाद) : गंगापूर तालुक्यातील कामगार, शेतकरी व नागरिकांचे लक्ष लागून असलेल्या गंगापूर सहकारी साखर कारखान्याच्या १५ कोटी ७५ लाख रुपयांच्या अपहार प्रकरणात १६ पैकी तीन आरोपींनी दाखल केलेला अंतरिम जामीन अर्ज वैजापूर येथील सत्र न्यायालयाने फेटाळला. अंतिम सुनावणी आठ डिसेंबरला होईल. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

यासंदर्भात माहिती अशी की, आमदार प्रशांत बंब, प्रभारी कार्यकारी संचालकांसह १६ जणांविरोधात १५ कोटी ७५ लाख रूपयांच्या अपहार प्रकरणात गंगापूर पोलिस ठाण्यात १८ नोव्हेंबररोजी गुन्हा दाखल केला होता. यातील तीन जणांनी वैजापूर येथील सत्र न्यायालयामध्ये जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. आज सुनावणी झाली. त्यात मनोरमा काबरा, विद्या मुनोत आणि पारस मुथा यांच्यावतीने न्यायालयात बाजू मांडताना सांगण्यात आले, की आम्ही प्राप्तिकर भरणारे असून गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे सभासद नाही. आम्ही संचालक मंडळाचा कुठलाही ठराव केलेला नाही, कारखान्याचे कुठलेही खाते उघडण्यासाठी आमच्या सह्या नाहीत. साखर कारखान्याने पेपरमध्ये केलेल्या आवाहनानुसार पारस मुथा यांनी ६२ लाख रूपये, विद्या मुनोत यांनी ४० लाख रूपये व मनोरमा काबरा यांनी ३० लाख रूपये कारखान्याला कर्जाऊ दिले होते. म्हणून त्याच्या व्याजासह एकाला एक कोटी, एकाला ७० लाख व एकाला ५० लाख रूपये कारखान्याकडून परत दिल्याचे भासवण्यात आले. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

आम्ही आमचे वरील पैसे बँकेत ठेवले असते तर त्यापेक्षा जास्त मिळाले असते. त्यामुळे आम्हाला मिळालेली रक्कम कारखान्याने ८ टक्के व्याजदराने दिली आहे. वरील पैसे कारखान्याने वेळेत न दिल्याने आम्ही कारखान्याला नोटीसा देखील दिल्या होत्या. परंतु, चेअरमन आमदार प्रशांत बंब यांनी सांगितले की ३१ डिसेंबरच्या आत तुमचे पैसे देतो, यावरून आम्हाला वरील रकमा मिळाल्या आहेत. शिवाय मनोरमा काबरा यांच्या भावाचे आपरेशन असल्याच्या वैद्यकीय कारणावरून त्यांना जामीन देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

न्यायालयाने घोटाळ्यात कारखान्याच्या अडकलेल्या मोठ्या रकमेचे गांभीर्य पाहता आरोपींच्या वकिलांचा वरील युक्तीवाद अमान्य करीत अंतरिम जामीन फेटाळून या प्रकरणाची अंतिम सुनावणी ८ डिसेंबररोजी ठेवण्यात आली. या प्रकरणामध्ये सरकारी वकील म्हणून अॅड. नानासाहेब जगताप यांनी, कृष्णा पाटील डोणगावकर यांच्यावतीने मंगेश जाधव व कारखान्यातील कामगारांच्यावतीने अॅड. कृष्णा पाटील ठोंबरे यांनी बाजू मांडली.

(संपादन-प्रताप अवचार) 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Interim bail rejected Gangapur sugar factory case