देगलूरच्या त्या १९ गावांचा खंडीत वीजपुरवठा सुरु

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 25 April 2020

देगलूर तालुक्यात पेटवलेले वडाचे झाड जळून वीजवाहिनीवर कोसळल्याने महावितरण कर्मचाऱ्यांचे अविश्रांत परिश्रम, तमलूर व शाहपूर उपकेंद्राचा दहा तासात वीजपुरवठा पुर्ववत.

नांदेड : अज्ञात इसमाने पेटवून दिलेले वडाचे झाड वीजतारांवर कोसळून देगलूर ग्रामीण उपविभागांतर्गत येणाऱ्या ३३ केव्ही तमलूर व ३३ केव्ही शाहपूर उपकेंद्राचा वीजपुरवठा खंडीत होवून १९ गावांना विजेविना रहावे लागले. मात्र महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी समर्थपणे निर्माण झालेल्या परिस्थितीला तोंड देत थोडीशीही उसंत न घेता १० तासात १९ गावांचा वीजपुरवठा सुरळीत करत पाच हजार वीजग्राहकांना दिलासा दिला.

सध्या राज्यात 'लॉकडाऊन' ची स्थिती विदारक असतानाही महावितरणचे कर्मचारी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सजगपणे कार्यरत आहेत. कुठे अवकाळी व वादळी पावसाला तोंड देत तर कुठे मानवनिर्मित कारस्थानामुळे उदभवलेल्या परिस्थितीला लढवैय्ये जनमित्र वीजयंत्रणेला फटका बसून वीजग्राहक अंधारात राहू नये यासाठी सदैव तत्पर आहेत. मंगळवार (ता. २१) सायंकाळी साडेसहा वाजता ३३ केव्ही वीजवाहिनीच्या जवळ रस्त्याच्या कडेला असलेले वडाचे झाड अज्ञात इसमाने पेटवून दिल्याचे कळाले. उपकार्यकारी अभियंता विजय गारगोटे यांनी तात्काळ तहसीलदार व अग्निशमनला याबाबत  कळवले. 

हेही वाचानांदेडच्या ‘कंटेंटमेंट झोन’वर प्रशासनाचे लक्ष... 

शहापूर उपकेंद्रांतर्गत १९ गावाचा पुरवठा सुरळीत

वीजयंत्रणेला काही नुकसान होवू नये म्हणून वीजपुरवठा खंडीत करून झाडाची आग विझवून टाकली. मात्र रात्री साडेदहा वाजता परत त्याच झाडाला कोणीतरी आग लावल्यामुळे झाड जळून ३३ केव्ही वीजवाहिनीवर तूटून पडले. त्यामुळे वीज वाहिनी व एक सिमेंटचा पोल तुटून पडला. परिणामी ३३ केव्ही तमलूर व ३३ केव्ही शाहपूर उपकेंद्रा अंतर्गत येणाऱ्या तमलूर, शाहपूर, नरंगल, आलूर, सांगवी, शेलगाव व चैनपूर गावासह १९ गावांचा वीजपुरवठा ख्ंडीत झाला होता. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी क्षणाचीही उसंत न घेता दुरूस्तीच्या समानाची जुळवाजूळव करत लगेचच दुरूस्तीला सुरवात केली. बुधवारी सकाळी आठ वाजून ५० मिनीटाला दोन्ही उपकेंद्राचा वीजपुरवठा पुर्ववत करण्यात यश मिळाले. 

उपकार्यकारी अभियंता विजय गारगोटेसह कर्मचाऱ्यांचे परिश्रम

महावितरणच्या देलूर ग्रामिण उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता विजय गारगोटे यांनी क्षणाचीही उसंत न घेता खंडीत झालेला वीजपुरवठा पुर्ववत करण्यासाठी सहायक अभियंता नरेंद्र टकलेसह जनमित्र श्री वाघमारे, श्री यन्नावार, शेख, श्री ताठे तसेच श्री भगदकर यांच्यासह परिश्रम घेतले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Interrupted power supply to 19 villages started nanded news