नामस्मरणातून ताण-तणावांवर मात सहज शक्य

प्रमोद चौधरी
शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019

आज प्रत्येकजणच तणावमुक्तीसाठी वाटा शोधत आहेत. अशाच वाटा गौरवनगरमधील महिलांनी शोधल्या आहेत. त्या नियमित भजन, सतत नामस्मरण करीत तसेच एकमेकींची सुख दुःख जाणून घेत असल्याने संसारातील ताणतणावांवर सहजपणे मात करीत आहेत.

नांदेड : घरची संसारिक सर्व जबाबदारी सांभाळून गौरवनगर परिसरातील महिलांना नामस्मरणातून ताण-तणावांवर सहजपणे मात करीत आहेत. नियमित भजन, सतत नामस्मरण करीत असल्याने तसेच एकमेकींची सुख दुःख जाणून घेत असल्याने संसारातील ताणतणावांवर सहजपणे आम्हाला मात करणे शक्य होत असल्याच्या प्रतिक्रिया महिलांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

‘‘झणी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा, जेणें माझ्या मना बोध केला’’. तुझ्या सगुणरुपाने मी मोहून गेलो. तुझ्या दशर्नाने जन्मोजन्मीचे दुःख नाहीसे होते. आता मागेपुढे तूच दिसत आहेस. जीवन तुझे चरणी अर्पण केले, असा भावार्थ संत नामदेव महाराजांनी दिला आहे. याच भावार्थाचा संदेश घेऊन गौरवनगरमधील महिलांची वाटचाल सुरु आहे. २००१ पासून माऊली भजनी मंडळाच्या माध्यमातून गौरवनगरमधील महिला हरिनामाचा गजर करीत आहेत. प्रत्येक एकादशीला पासदगाव येथील अशोक महाराज आळंदीकर यांच्या आश्रमात या महिला भजन करतात. शिवाय शहरातील विविध भागांतही निमंत्रण आल्यास निःस्वार्थपणे भजन, गौळणींचा कार्यक्रम देखील या महिला करत आहेत.

स्पर्धांसह प्रबोधनपर कार्यक्रमही

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे दरवर्षी होत असलेल्या भजनस्पर्धांमुळे या महिलांना प्रोत्साहन मिळाले आहे. या स्पर्धेत मंडळाने पंढरपूर, अमरावती येथे राज्यस्तरावरील भजन स्पर्धेत नांदेड केंद्राचे प्रतिनिधित्व केलेले आहे. याशिवाय भारूड स्पर्धांतही मंडळाने सहभाग नोंदविलेला आहे. सार्वजनिक कार्यक्रमांतून भारूड, गौळणी तसेच भजनांतून मंडळातील सर्व सदस्या हुंडापद्धत, स्वच्छता, स्त्रीभ्रूणहत्या, शिक्षण अशा विविध सामाजिक समस्यांवर प्रबोधनही करतात. नवरात्रोत्सवातही नऊ दिवस या महिला घरोघरी तसेच सार्वजनिक दुर्गा मंडळांसमोर देवीची गाणीही सादर करतात. डोहाळे जेवण, बाळाचे नाव ठेवण्याचे कार्यक्रमातही गौरवनगर भजन मंडळातील महिलांचा उत्साहाने सहभाग असतो.

छंदातून उभे राहिले मंडळ

महावितरण कंपनीतून निवृत्त झालेले चंद्रकांत पांडे आणि त्यांच्या पत्नी सुनंदा पांडे यांना लहानपणापासूनच भजन गायनाची आवड होती. त्यामुळे श्री. पांडे यांनी नोकरी सांभाळून भजन गायनाचाही छंद जोपासला. नांदेडमध्ये स्थायिक झाल्यावर या पती-पत्नींनी परिसरातील महिलांना एकत्रित करून २००१ मध्ये माऊली भजनी मंडळाची स्थापना केली. एवढेच नाही तर दोन मुले, सुना व नातवंडांनाही भजन गायनाची गोडी लावली. हे सर्वजण आता भजनगायनासोबतच शास्त्रीय-उपशास्त्रीय कलेची जोपासना करून नवोदीत कलाकार तयार करीत आहेत. पांडे पती-पत्नीचा हा नामस्मरणातून ताण-तणावावर मात करण्यासाठीचा प्रयत्न खरोखरच सर्वांसाठीच प्रेरणादायी असाच आहे.

दमदार वाटचाल

मंडळाच्या माध्यमातून एकमेकांचे सुख-दुःख माहित होतेच. शिवाय एकतेचीही भावना निर्माण होत असते. माऊल भजन मंडळामध्ये सुनंदा पांडे, वनमाला गिरी, संगीता देशमुख, सुजाता महागावकर, शोभा हरगंगे, वनिता वाघमारे, संगीता देशपांडे, मंजूषा बिरकुले, पुष्पा गंगावणे यांचा समावेश आहे. या सर्व महिला सदस्यांना तबल्यावर चंद्रकांत पांडे उत्कृष्ट साथ देत असल्याने महिलांना पाठबळ मिळत असून, त्यांच्यामुळे मंडळाची दमदार वाटचाल सुरु आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: It is easily possible to overcome the stresses of naming