Video : अशी लावली ‘एटीएम’ ला आग 

गणेश पांडे
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

०- आग लावणारा व्यक्ती ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यात कैद
०- बँकेच्या अधिकाऱ्यांनी नवा मोंढा पोलिस ठाण्यात नोंदवली तक्रार
 

परभणी : परभणी येथील जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीसमोरील ‘एटीएम’ मशीनला आग लावणारा व्यक्ती ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणी बँकेच्या अधिकाऱ्यांनी नवा मोंढा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

परभणी शहरातील भारतीय स्टेट बँकेच्या ‘एटीएम’ सेंटरला चार डिसेंबर रोजी आग लागली होती. या आगीत संपूर्ण एटीएम सेंटर जळून खाक झाले होते.

 

 

या घटनेनंतर बँकेचे व्यवस्थापक शैलेंद्र कुमार चौधरी, चारुदत्त पी. विश्वासराव, गंगाप्रसाद साधू, कालिदास रणदिवे,  दुलालचंद्र मंडल, शेख अमजद सरदार खान, रमेश खवले, या बँक अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी बँकेच्या ‘सीसीटीव्ही’ फुटेजची तपासणी केली. त्यानंतर शैलेंद्र कुमार चौधरी यांनी नवा मोंढा पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता. पाच) सायंकाळी तक्रार नोंदवली. 

१३ लाख रुपयांचे नुकसान 
या तक्रारीत म्हटले आहे की, एक व्यक्ती हातात पांढऱ्या रंगाची प्लास्टिकचे क्यान घेऊन आला होता. त्याने त्यांमधील द्रव ‘एटीएम’ मशीन वर टाकून आग लावून दिली. या व्यक्तीच्या तोंडावर व डोक्यावर पांढरा रुमाल गुंडाळलेला होता. या घटनेत एटीएम मशीन अंदाजे दहा लाख रुपये फर्निचर व यूपीएस तीन लाख रुपये असा १३ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही आग का लावण्यात आली? याची चौकशी आता नवा मोंढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. रामेश्वर करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: It was set on fire at 'ATM'