
जाफराबाद शहरातील निमखेडा रस्त्यावर नातेवाईकाच्या घरी साखरपुड्याचे निमित्त करून तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा गुरुवारी (ता.दहा) सकाळी होणारा बालविवाह पोलिसांच्या सजगतेमुळे रोखला गेला.
जाफराबाद (जि.जालना) : शहरातील निमखेडा रस्त्यावर नातेवाईकाच्या घरी साखरपुड्याचे निमित्त करून तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा गुरुवारी (ता.दहा) सकाळी होणारा बालविवाह पोलिसांच्या सजगतेमुळे रोखला गेला.जाफराबाद शहरातील निमखेडा रस्त्यावर एका नातेवाईकाच्या घरी दुसऱ्या गावातील मुलगा व अल्पवयीन मुलीचा साखरपुडा आणि त्यातच बालविवाह गुरुवारी होणार होता. त्यामुळे येथे मंडप टाकण्यासह लग्नाची जय्यत तयारी करण्यात आली होती.
याबाबत माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक अभिजित मोरे, पोलिस उपनिरीक्षक युवराज पोठरे, महिला पोलिस कर्मचारी जया निकम, शबाना तडवी यांनी लग्नस्थळी धाव घेतली. मुलगी, मुलीचे वडील तसेच नातेवाईक यांचे समुपदेशन केले. कायद्याबाबत माहिती देत हा विवाह करण्यापासून रोखले. मुलगा व त्याचे नातेवाइकांना फोनवरून संपर्क साधला, त्यांना अर्ध्या रस्त्यावरून परतून लावले. या संदर्भात अभिजित मोरे यांनी बालहक्क संरक्षण समिती व महिला बालकल्याण समितीला घटनेची माहिती दिली. यापूर्वीही दोन महिन्यांपूर्वी अशाच पद्धतीचा बालविवाह जाफराबाद पोलिसांनी रोखला होता. बालविवाह रोखण्यासाठी शासनाच्या १०९८ या टोलफ्री क्रमांकावर संपर्क करावा ,असे आवाहन यानिमित्त करण्यात आले.
Edited - Ganesh Pitekar