esakal | बीडमध्ये जोगदंडचे दर्जाहिन कामे अन् राष्ट्रवादीतील धुसफुसही चव्हाट्यावर
sakal

बोलून बातमी शोधा

Sandip Kshirsagar

डॉ.जोगदंड यांच्या मे. डी. बी. कंस्ट्रक्शन कंपनीमार्फत केल्या जाणाऱ्या साडेसात कोटी रुपयांची रस्ता कामे दर्जाहिन केली जात असून मुदतीनंतरही कामे अपूर्ण असल्याची तक्रार राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी व कार्यकारी अभियंत्यांकडे तक्रार केली आहे. या तक्रारीनंतर डी. बी. बागल यांचे पत्रक यावरुन राष्ट्रवादीतील अंतर्गत धुसफुसही चव्हाट्यावर आली

बीडमध्ये जोगदंडचे दर्जाहिन कामे अन् राष्ट्रवादीतील धुसफुसही चव्हाट्यावर

sakal_logo
By
दत्ता देशमुख

बीड : शासकीय येाजना व निधीतील कामे दर्जेदारच झाली पाहिजेत. यासाठी आमदार संदीप क्षीरसागर कायम आग्रही असतात. बीड नगरपालिकेच्या कामांच्या बाबतीतही कमी अधिक झाले, तरी राष्ट्रवादीचा ताफा कामावर पोचतो आणि काम बंद पाडले जातात. अगदी खुद्द संदीप क्षीरसागरही ऑन द स्पॉट असतात. आता बीड मतदारसंघातीलच ग्रामीण भागात सुरु असलेल्या दर्जाहिन रस्ता कामांचा प्रकारसमोर आला आहे.


विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्याच पदाधिकाऱ्यांनी तक्रार करुन हा दर्जाहिन कामांचा प्रकार चव्हाट्यावर आणला असला तरी या तक्रारीमुळे राष्ट्रवादीतील बेदीलीही समोर आली आहे. कारण, तक्रारीनंतर लागलीच ज्येष्ठ नेते अॅड. डी. बी. बागल यांनी पत्रक काढून बाहेर तक्रारी चुकीच्या असून बसून चर्चा होऊ शकते. ज्यांना स्वमर्जीने वागायचे आहे. त्यांना रस्ते रिकामे या सल्ल्यामुळे राष्ट्रवादीतही अंतर्गत धुसफुस सुरु असल्यावर शिक्कामोर्तबच झाले आहे.


मात्र, दर्जेदार कामांसाठी नेहमी आग्रही असणारे आमदार संदीप क्षीरसागर याबाबत काय भुमिका घेतात हे पाहावे लागणार आहे. तालुक्यातील मन्यारवाडी ते आंबेसावळी, ढेकणमोहा व बऱ्हाणपूर, नागापूर (बु) ते उंबरी फाटा या साडेसात कोटी रुपयांच्या दोन रस्त्यांची कामे करणाऱ्या ठेकेदाराने दर्जाहिन आणि अर्धवट कामे केली आहेत. गायरानातलाच मुरुम आणि नदीतले दगडगोठे वापरुन शासनाचाही महसूल बुडविला आहे. एवढीच तक्रार करुन पदाधिकारी गप्प बसले नाहीत तर डॉ. जोगदंड यांच्या मुसक्या आवळाव्यात अशा शब्दांत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गंगाधर घुमरे, नगरसेवक अमर नाईकवाडे आणि फारुक पटेल यांनी जिल्हाधिकारी व कार्यकारी अभियंत्याकडे मागणी केली आहे.

वर्षभराची मुदत असतानाही अडीच वर्षानंतरही कामे अपूर्ण आहेत. खडीऐवजी नदीपात्रातील गोट्यांचा वापर केला असून खडीकरणाचा पृष्ठभागही साफ केला नाही. त्यावर एमएमपी व रोलरने दबाईही केली नाही. माती मिश्रित मुरूमाचा वापर करुन शासनाचा महसूलही बुडविला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मुदत उलटल्याने दंड आकारण्याची मागणीही करण्यात आली आहे. सदर काम हे बीड मतदारसंघातील ग्रामीण भागातील आहे. तसे, बीड शहरातील कामांबाबत शंका येताच राष्ट्रवादीचा फौजफाटा पोचतो आणि काम बंदही पाडले जाते.

काही कामांच्या ठिकाणी संदीप क्षीरसागर स्वत: जातात. यावरुन दोन्ही क्षीरसागरांत आरोप - प्रत्यारोपांच्या फैरीही झडत असतात. मात्र, डॉ. जोगदंड यांच्या नावाने तक्रार करुन राष्ट्रवादीतील घुमरे, नाईकवाडे आणि पटेल यांनी धमाकाच उडवून दिला आहे. कारण, जोगदंड कोणाच्या जवळचे आणि त्यांना पाठबळ कोणाचे याची माहिती बीड राष्ट्रवादी माहीत असणाऱ्या सर्वांना आहे. तरीही राष्ट्रवादीच्याच पदाधिकाऱ्यांनी तक्रार करण्यामागचे धाडस बरेच काही सांगून जाते. या तक्रारीनंतर अॅड. डी. बी. बागल यांचे प्रसिद्ध झालेल्या पत्रकामुळे आता अंतर्गत धुसफुस वाढल्यावरही शिक्कामोर्तब झाले आहे.

संपादन - गणेश पिटेकर

loading image