
Jalna : दहीफळ पाटीवर अपघात नव्हे घातपात
परतूर : तालुक्यातील यदलापूर येथील माजी सरपंच गोपाळ मरळ यांचा ता.पाच जानेवारीला रात्री दहीफळ पाटीवर संशयास्पद अपघाती मृत्यू झाला होता. दरम्यान, हा खून असल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला होता. त्यामुळे या घटनेचा कसून तपास करत पोलिसांनी छडा लावला. त्यात हा अपघात नसून घातपात असल्याचे समोर आले. पोलिसांनी याप्रकरणी एका संशयितास ताब्यात घेतले आहे.
यदलापूरचे माजी सरपंच गोपाळ मरळ हे दुचाकीवरून ता.पाच जानेवारीला रात्री घराकडे जात होते. तेव्हा दहीफळ पाटीजवळ अनोळखी वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली होती, त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, याप्रकरणी ता.१० जानेवारीला पोलिस ठाण्यात भारत जनार्दन मरळ यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तक्रार व नातेवाइकांनी व्यक्त केलेल्या संशयाच्या आधारावर पोलिस अधीक्षक डॉ अक्षय शिंदे, उपविभागीय पोलिस अधिकारी राजू मोरे व पोलिस निरीक्षक शामसुंदर कौठाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सचिन पुंडगे व पोलिस कर्मचारी आबासाहेब बनसोडे यांनी तपासाची चक्रे फिरविली.
यात संशयित बळीराम अनंतराव मरळ (वय २९, रा.यदलापूर, ह.मु.औरंगाबाद) यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलिस कर्मचारी आबासाहेब बनसोडे, नितीन बोंडारे, ज्ञानेश्वर वाघ यांनी मदत केली. दरम्यान, पोलिसांनी औरंगाबादेतून जीपही ताब्यात घेतली.
संशयित बळीराम मरळ यास न्यायालयात हजर केले, त्यात त्यास तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती श्री. पुंडगे यांनी दिली.
सीसीटीव्हीची झाली मदत
पोलिस तपासात परतूर-रांजणी रस्त्यावरील गावात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे पोलिसांना तपास करताना मदत झाली. त्यामुळे पोलिसांना तपास करताना दिशा मिळाली.
अशी घडली घटना
गोपाल मरळ आणि बळीराम मरळ यांचे सहा महिन्यांपूर्वी शेतीच्या वादातून जोरदार भांडण झाले होते. यात तक्रारीही दाखल झाल्या होत्या. हा राग बळीरामच्या मनात होता. त्याने घातपात करण्यासाठी एक जीपही विकत घेतली. वाहन चालविणे शिकून घेतले. त्यानंतर स्वतः वाहन चालवत गोपाळवर पाळत ठेवली. त्यानंतर ता.पाच जानेवारीला रात्री आठ वाजता वाटूर-जालना रस्त्यावर दहीफळ फाट्यावर दुचाकीला जीपची जोराची धडक दिली, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.