esakal | दुर्दैवी! बापलेक जिवाच्या आकांताने ओरडत होते; अखेर बापाला गमवावा लागला जीव
sakal

बोलून बातमी शोधा

accident news

दुर्दैवी! बापलेक जिवाच्या आकांताने ओरडत होते; अखेर बापाला गमवावा लागला जीव

sakal_logo
By
प्रमोद सरवळे

बदनापूर (जालना): रिकाम्या बाटल्या घेऊन जाणारा मालवाहू आयशर ट्रक लोखंडी कठडे तोडून 40 फूट खोल दुधना नदीच्या पुलाखाली कोसळला. अपघातात ट्रक चालक पिता ठार झाला आहे तर क्लिनर असलेला मुलगा गंभीर जखमी झाला.

ही दुर्दैवी घटना जालना - औरंगाबाद महामार्गावरील बदनापूर शहरातील पुलावर बुधवारी (ता. 14) सकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली.

दरम्यान, अपघातग्रस्त ट्रक पुलाखालील दोन्ही खांबात फसल्याने मृत वडील व जखमी मुलाला बाहेर काढण्यास तब्बल पाच तासांचा अवधी लागला.नायगाव (ता. जि. औरंगाबाद) येथील चाँद कडू बेग (वय 48) व वाहेद चाँद बेग (वय 23) असे पितापुत्र नांदेड येथून रिकाम्या बाटल्या घेऊन आयशर ट्रकने (क्रमांक : एम. एच. 43 वाय 8709) औरंगाबादकडे परतत होते.

दरम्यान, सकाळी सहा वाजेच्या सुमारास त्यांचा आयशर ट्रक बदनापूर जवळ पोचला असता त्यांचा ट्रक दुधना नदीच्या पुलावरील लोखंडी कठड्याला धडकून थेट चाळीस फूट खोल खाली कोसळला. दुर्दैवाने हा ट्रक दोन्ही पुलांच्या मध्यभागी असलेल्या काँक्रीटच्या खांबात जाऊन फसला. त्यामुळे ट्रकमधील लोकांना बाहेर काढण्यास मोठी अडचण निर्माण होत होती.

अर्थात घटनास्थळावर असलेल्या लोकांना ट्रकमध्ये फसलेले बापलेक जिवाच्या आकांताने मदतीसाठी याचना करीत होते, असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

तेव्हा बदनापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक मारुती खेडकर यांनी तात्काळ पोलिसांच्या पथकाला घटनास्थळी हजर करून दोन क्रेनची व्यवस्था केली. यावेळी स्थानिक तरुणांनाही पुढाकार घेत क्रेन आणि गॅस कटरच्या माध्यमातून ट्रकने कॅबिन कापले. बचावकार्याची प्रक्रिया तब्बल पाच तास सुरू होती. मात्र दुर्दैवाने या घटनेत पिता चाँद बेग ठार झाले.

मात्र मुलगा वाहेद बेग याचा जीव वाचविण्यात यश मिळाले. चाँद बेग हे वाहन चालवत होते झोपेच्या तंद्रीत त्यांचे ट्रकवरील संतुलन सुटल्याने ट्रक पुलाखाली कोसळला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

पोलिसांनी मृत चाँद बेग यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बदनापूर ग्रामिण रुग्णालयात पाठवला. तेथून प्रक्रिया पार पडल्यावर त्यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधिन करण्यात आला.

जखमी वाहेद बेगला उपचारासाठी प्रारंभी जालना येथील सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले होते. तेथून त्यास अधिक उपचारासाठी औरंगाबादला हलविण्यात आले आहे.