Jalna : सततच्या पावसाचा शेतीला फटका

ठिकठिकाणी पिके पाण्याखाली, बांधही फुटले
jalna
jalnasakal

जालना : तालुक्यातील अनेक गावांना पावसाचा जोरदार फटका बसला असून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.ठिकठिकाणी पिके पाण्याखाली आहेत. अनेकांच्या शेतीचे बांधही फुटले आहेत.

जालना तालुक्यातील मोतीगव्हाण, साळेगाव, दहिफळ, मानेगाव, निरखेडा, मौजपुरी, पारेगाव, पाडेगाव, सावंगी, बाजीउम्रद, पहेगाव या सह अनेक गावातील उभ्या पिकांना सतत पडणाऱ्या पावसाचा तडाखा बसला. मुसळधार पावसामुळे असंख्य शेतातील माती खरडून गेली. शिवाय शेतातील बांधही पावसाच्या पाण्याने फुटून गेल्याचे पाहावयास मिळत आहे. तालुक्यातील इतरही गावांत पावसाने हजेरी लावलेली आहे. गत दीड महिन्यापासून दररोजच रात्री तर कधी दिवसा पाऊस हजेरी लावत आहे. सततच्या पावसाने कपाशीला लागलेली बोंडे काळी पडून सडू लागली आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. एकंदरीत सर्वच पिके संकटात सापडली आहे.

मागील आठवड्यापासून सततच्या पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी दिसत होते. नद्या, नाले, तलाव, ओढे, पाण्याने तुडूंब भरून वाहिले. या पाण्यामुळे फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे. मोसंबी, डाळिंब, बागेत पाणी तुंबल्याने या फळबागांची मोठी हानी होणार आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी विवंचनेत सापडला आहे. सर्व शेतशिवार जलमय झाले. शेतांना तलावाचे तर पिकांतून वाहणाऱ्या पाण्यास ओढ्याचे स्वरूप आल्याचे पाहावयास मिळाले. सततच्या मुसळधार पावसाने फळबागांचेही प्रचंड नुकसान होत असून पाणी साचल्याने झाडांच्या पांढऱ्या मुळ्या सडून झाडे वाळत आहे. मोसंबीच्या शेतांमध्ये पाणी साचले आहे. परिणामी, शेतातील उभे पिके पाण्यामुळे सडू लागली असून सोयाबीन, कापूस पिकाला सर्वाधिक फटका बसला आहे. सर्वच पिके या वर्षीच्या पावसामुळे सर्व वाया गेले.पावसाने शेतीचे फार नुकसान झाले असून सरकारने तातडीने मदत द्यावी,अशी मागणी वखारी ( ता.जालना) येथील शेतकरी संतोष खैरे यांनी केली आहे.

जिल्ह्यात पावसाच्या रिमझिम सरी

जालना : जिल्ह्यात सोमवारी विविध भागात पहाटेपासून पावसाच्या रिमझिम सरी कोसळल्या. त्यातच दुपारनंतर मात्र ढगाळ वातावरण होते.

मंठा शहरासह तालुक्यात रविवारी रात्रभर पावसाची रिपरिप सुरू होती. त्यात सोमवारी सकाळपासून अधूनमधून पाऊस सुरू होता. दिवसभर ढगाळ वातावरण होते. भोकरदन तालुक्यातील केदारखेडा परिसरात रविवारी रात्री दहापासून सुरू झालेला भीजपाऊस सकाळपर्यंत कायम होता. या परिसरात सलग चार दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतशिवारात वाफसा नसल्याने पिके पिवळी पडत आहेत. मंठा तालुक्यातील तळणी परिसरात सकाळी रिमझिम सरी पडल्या.

त्यानंतर दुपारपासून ढगाळ वातावरणामुळे सूर्यदर्शनही झाले नाही. सुखापुरी परिसरात दुपारी हलक्या स्वरूपाची भुरभुर सुरू होती. थोड्यावेळ रिमझिम पाऊसही पडला. कुंभार पिंपळगाव परिसरात दुपारी बारा वाजेपर्यंत पाऊस पडला. त्या नंतर पावसाने उघाडी दिली. सायंकाळनंतर पुन्हा आभाळ भरून आले होते. टेंभुर्णी परिसरात पावसाची भुरभुर दिवसभर सुरू होती. परतूरला सकाळपासून पावसाची रिपरिप झाली. अनेक भागात ढगाळ वातावरण होते.

घनसावंगी परिसरात पावसाची हजेरी

घनसावंगी : शहर व तालुक्‍यात ठिकठिकाणी सोमवारी (ता.१२) सकाळी पावसाने हजेरी लावली. मागील चार ते पाच दिवसापासून शहर व तालुक्‍यातील विविध भागात जोरदार पाऊस सुरू आहे. सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान होण्याची भिती व्यक्त होत आहे. दरम्यान, ऑगस्ट महिन्यात उघडीप दिल्यानंतर आता चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे आगामी काळात पाणीटंचाईचा प्रश्‍न सुटेल तसेच सिंचन प्रकल्पातील पाणीपातळी वाढण्यास मदत होणार आहे.

जिल्ह्यात सरासरी २३.७० मिलिमीटर पाऊस

जालना : जिल्ह्यातील विविध भागात सोमवारी (ता.१२) सकाळपर्यंतच्या मागील २४ तासात सरासरी २३.७० मिलिमीटर एवढ्या एकूण पावसाची नोंद झाली आहे. यात जालना तालुक्यात ३२.७० मिलिमीटर तर आतापर्यंत ७५८.९०, बदनापूरला ३५.६० तर आतापर्यंत ६७३.१०, भोकरदनला २८.१० तर आतापर्यंत ७३९.५०, जाफराबाद २१ तर आतापर्यंत ७५६, परतूरला १३.७० तर आतापर्यंत ६५९.६० , मंठा तालुक्यात १७.५० तर आतापर्यंत ७३३.५०, अंबडला १८.२० तर आतापर्यंत ५९२.५०, घनसावंगी तालुक्यात १८.३० तर आतापर्यंत ५८१.९० मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात जूनपासून सोमवारपर्यंत एकूण ६८४.३० मिलिमीटर अशा ११३.४६ टक्के एवढ्या पावसाची नोंद करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com