Jalna : पावसामुळे पीकनुकसानीच्या भरपाईची आदेश आले, पण निधी नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crop Loan

Jalna News: पावसामुळे पीकनुकसानीच्या भरपाईची आदेश आले, पण निधी नाही

जालना : पावसामुळे पीकनुकसानीच्या भरपाईची शेतकऱ्यांना प्रतीक्षा जिल्ह्यात यंदा सुरुवातीला पावसाने ओढ दिली होती. जुलै महिन्यानंतर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहिला. त्यात परतीच्या पावसाने खरीप पिकासह फळपिकांचे अतोनात नुकसान झाले. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसाने जिल्ह्यात तब्बल तीन लाख ६९ हजार ६८० शेतकऱ्यांचे दोन ते तीन हेक्टरवरील तब्बल चार लाख ९२ हजार २७८.३६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.

जिल्हा प्रशासनाकडून या नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठविल्यानंतर राज्य शासनाकडून ता.१७ नोव्हेंबर रोजी पिकांच्या नुकसानीची मदत जाहीर केली आहे. यात जिल्ह्याच्या खरीप पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या वाट्याला एकूण ३९७ कोटी ७३ लाख १४ हजारांची निधी मिळणार आहे.

हा निधी जाहीर करताना शासनाकडून जिरायती पिकांसाठी तीन हेक्टरपर्यंत प्रति हेक्टर १३ हजार ६०० रुपये, बागायती पिकासाठी तीन हेक्टरपर्यंत प्रति हेक्टर २७ हजार तर फळपिकांसाठी तीन हेक्टरपर्यंत प्रति हेक्टर ३६ हजारांची मदत जाहीर केली आहे.

मात्र, मदत जाहीर करून ही पाच ते सहा दिवस झाले आहेत. त्यानंतर अद्याप जिल्ह्यात अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईचा निधी अद्यापि आलेला नाही.

परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेले सोयाबीन, कपाशी पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यात शासनाकडून ही मदतीला उशीर होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता आदेश निघाले आहे, मदत कधी येणार याचीच शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.

उपविभागीय अधिकारी तपासणार याद्या

परतीच्या अतिवृष्टीने ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या तयार झालेल्या आहेत. मात्र, या याद्या तयार करताना त्या व्यवस्थित झाल्या आहेत काय, त्यात काही त्रुटी आहे काय, यादीतील शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे काय, क्षेत्र बरोबर आहे काय या बाबी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत तपासण्यात येणार आहेत. यासंदर्भात सोमवारी आदेश दिले आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांनी दिली.