Jalna News : जालन्यातील फटाका मार्केट असुरक्षित; सुरक्षेच्या उपाययोजना तोकड्या; अनेक दुकानांसमोरील ड्रम पाण्याविना रिकामे

आझाद मैदान आणि कल्याणराव घोगरे क्रीडा संकुल या दोन्ही ठिकाणच्या फटाका मार्केटची सुरक्षा वाऱ्यावर आहे.
jalna fire cracker market security measures drums in front of many shops empty without water
jalna fire cracker market security measures drums in front of many shops empty without wateresakal

जालना : दिवाळी म्हटलं की फटाक्यांची आतषबाजी ठरलेलीच असते. लहान्यांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाची दिवाळीला फटाके खरेदीला अधिक पसंती असते. त्यामुळे दरवर्षी शहरात जालना महापालिकेकडून तात्पुरत्या फटाका मार्केटला मंजुरी देण्यात येते. यंदाही ७४ फटाक्याच्या दुकानांना मान्यता दिली आहे.

मात्र, आझाद मैदान आणि कल्याणराव घोगरे क्रीडा संकुल या दोन्ही ठिकाणच्या फटाका मार्केटची सुरक्षा वाऱ्यावर आहे. येथे अग्निशमन दलाचे वाहन उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. शिवाय दुकानांसमोरील अनेक ड्रममध्ये पाणीच नाही. त्यामुळे फटाका मार्केट असुरक्षित असल्याचे चित्र आहे.

दिवाळीमुळे शहरासह गावा-गावातील गल्लीबोळात फटाक्यांची दुकाने दिवाळीपूर्वी थाटली जातात. शहरातील आझाद मैदान आणि कल्याणराव घोगरे क्रीडा संकुल येथे तात्पुरता फटाका मार्केटला जालना महापालिकेने मान्यता दिली आहे.

त्यामुळे या ठिकाणी आज घडीला एकूण ७४ फटाका दुकाने थाटण्यात आली आहेत. यात शहरातील आझाद मैदान येथे ५० तर कल्याणराव घोगरे क्रीडा संकुल येथे २४ फटाक्यांची दुकाने आहेत. या फटाका मार्केटमध्ये दुकान सुरू करण्यासाठी महापालिकेला अडीच ते तीन लाखांचा कर मिळाला आहे.

मात्र, या फटाका मार्केटची सुरक्षा महापालिकेने वाऱ्यावर सोडली आहे. फटाका मार्केटमध्ये दुर्घटना घडली तर ती तत्काळ आटोक्यात यावी, यासाठी येथे अग्निशमन दलाची गाडी कायम सज्ज असणे अपेक्षित आहे.

या दोन्ही ठिकाणी फटाक्यांच्या दुकानांसमोर पाण्याचे ड्रम ठेवले आहेत. या पाण्यावर आणि अग्निशमन यंत्रणेवर येथील सुरक्षा अवलंबून आहे. विशेष म्हणजे कल्याणराव घोगरे क्रीडा संकुल येथील फटाका मार्केट येथील अनेक ड्रम हे पाण्याविना असून केवळ दिखावा म्हणून ठेवलेले आहेत.

त्यामुळे दुर्दैवाने एखादी दुर्घटना घडली तर महापालिकेला ती आटोक्यात आणण्यासाठी मोठी धावपळ करावी लागणार आहे. त्यामुळे फटाके खरेदी करण्यासाठी जाताना नागरिकांनी स्वतःची काळजी घेणे गरजेचे झाले आहे.

फटाका मार्केटमध्ये पाण्याचे टँकर ही नाही

शहरातील दोन्ही ठिकाणच्या फटाका मार्केटमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने अग्निशमन दलाची वाहन उपलब्ध नाहीत. केवळ आझाद मैदान येथील फटाका मार्केटमध्ये एक छोटे पाण्याचे टँकर दिसून आहे. तसेच अनेक ड्रमही पाण्याविना रिकामे आहेत.

महापालिकेकडून डोळेझाक

दोन्ही फटाका मार्केटमधील सुरक्षेसंदर्भात जालना शहर महापालिकेने दक्ष राहणे अपेक्षित आहे. मात्र, महापालिका प्रशासन फटाका मार्केट सुरक्षेकडे डोळेझाक करत आहे. त्यामुळे दुर्दैवाने मोठी दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण? असा प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

रस्त्याच्या कडेला फटाके विक्री

शहरासह गावा-गावांत रस्त्यांच्या कडेला फटाके विक्री होत आहे. मात्र, येथे देखील सुरक्षेची कोणतीही दक्षता घेतली जात नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे फटाके विक्री दरम्यान दुर्घटनेचा धोका कायम असून प्रशासन का दुर्लक्ष करते असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

शहरातील आझाद मैदान आणि कल्याणराव घोगरे क्रीडा संकुल येथील फटाका मार्केटला तात्पुरता परवाना दिला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने सर्व नियमांची माहिती फटाके विक्रेत्यांना दिली असून त्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

जर सुरक्षेच्या दृष्टीने हलगर्जी होत असेल तर संबंधितांवर कारवाई केली जाईल. शिवाय येथे अग्निशमन दलाचे वाहन चोवीस तास उपलब्ध करण्यासाठी संबंधित परवानाधारकांकडून शासकीय शुल्क भरण्यात आले की नाही हे तपासले जाईल.

— संतोष खांडेकर,आयुक्त, जालना शहर महापालिका, जालना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com