esakal | जालना: सततच्या पावसाने हिरव्या स्वप्नांचा चुराडा
sakal

बोलून बातमी शोधा

जालना - पावसाने जामखेड येथील शेतकरी भारत शेळके यांच्या शेतात साचलेले पाणी.

जालना: सततच्या पावसाने हिरव्या स्वप्नांचा चुराडा

sakal_logo
By
भगवान भुतेकर

रामनगर : जालना तालुक्यातील रामनगरसह परिसरात सततच्या पावसामुळे खरिपातील सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले. परिसरातील विहिरी तुडुंब भरल्या आहेत. वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसाने द्राक्ष बागांचेही मोठे नुकसान झाले आहे. परिणामी यंदाही ऐन बहरातील खरीप पिके डोळ्यांदेखत वाया गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

हेही वाचा: चुकीच्या पत्त्यामुळे 'नीट' परीक्षा देणाऱ्यांची धांदल

सप्टेंबर महिना सुरू झाल्यापासून परिसरात ढगाळ वातावरणासह जोरदार पाऊस पडत आहे. दरवर्षी अनेक अडचणीचा सामना करत मोठ्या उमेदीने शेतकरी कपाशी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन या खरीप पिकांची लागवड करतात. यंदा पावसाने उशिरा का होईना समाधानकारक सुरुवात केल्याने शेतकऱ्यांमध्ये जास्त उत्पन्नाचे आशेने उत्साहाचे वातावरण होते. मात्र यंदा प्रथमच सततच्या पावसाने ओढे, नाले, विहिरी तुडुंब भरून ओसंडून वाहत आहे. अति पावसामुळे खरिपातील कपाशी, सोयाबीन, तूर, मूग आदी पिके पाण्याखाली गेली आहेत.

बहुतांशी ठिकाणी पाण्याचा निचरा होत नसल्याने जमीनी खरवडून जाण्याचे प्रमाणही वाढले आहे. यामध्ये द्राक्ष फळ बागांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच कमी कालावधीत जास्त उत्पन्न देणाऱ्या मूग, उडीद या नगदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे जमिनीत ओल कायम असून जमिनी खचण्याचे प्रमाणही वाढले आहे. लवकर लागवड झालेल्या मूग उडिदाच्या शेंगा तोडणीच्या हंगामातच सतत पावसाची रिपरिप सुरूच आहे.

त्यामुळे बहुतांशी शेतकऱ्यांना शेंगांची तोडणीही करता आलेली नाही. सततच्या पावसाने सर्वत्र दलदल व चिखलमय वातावरण निर्माण झाले आहे. परिसरातील ओढे, नदी, नाले, विहिरी ओसंडून वाहत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून शेतातील आंतरमशागतीची कामे ठप्प झाल्याने गवताचे प्रमाणही वाढले आहे. परिणामी दरवर्षीचा कर्जबाजारीपणा, महागडे बियाणे, रोगराई वरील कीटकनाशक फवारणी, बेभरवशाचा पाऊस आदी अडचणीने मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांची यंदाही सततच्या पावसाने संकटाची मालिका सुरूच असल्याचे दिसून येत आहे.

"यंदा बहरात असलेली सर्वच खरीप पिके डोळ्यादेखत वाया गेल्याने शेतकऱ्यांचे स्वप्न भंगले आहे. सततच्या पावसामुळे द्राक्ष फळ बागांचेही मोठे नुकसान झाले आहे. ढगफुटी सदृश झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. शासनाने पिकांचा पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत करावी." - हरिभाऊ गोरे, शेतकरी, भिलपुरी

"यंदाही अति पावसामुळे शेतकऱ्यांचा हाती आलेला खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला आहे. शासनाने पंचनामा, स्थळ पाहणी यासारखे कागदी घोडे न नाचवता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत करावी."- प्रल्हादराव शिंदे, माजी सरपंच,उटवद

loading image
go to top