esakal | चुकीच्या पत्त्यामुळे 'नीट' परीक्षा देणाऱ्यांची धांदल
sakal

बोलून बातमी शोधा

वैद्यकीय शिक्षणासाठीच्या प्रवेश पूर्णा (जि.परभणी) - परीक्षेसाठी येथील श्रीगुरु बुद्धीस्वामी महाविद्यालय परीक्षा केंद्राचा पत्ता ओळखपत्रावर संदिग्ध छापल्यामुळे अनेक परीक्षार्थी व पालकांची मोठी धांदल उडाली.

चुकीच्या पत्त्यामुळे 'नीट' परीक्षा देणाऱ्यांची धांदल

sakal_logo
By
जगदीश जोगदंड

पूर्णा (जि.परभणी) - वैद्यकीय शिक्षणासाठीच्या (Medical Education) प्रवेश परीक्षेसाठी येथील श्रीगुरु बुद्धीस्वामी महाविद्यालय परीक्षा केंद्राचा पत्ता ओळखपत्रावर संदिग्ध छापल्यामुळे अनेक परीक्षार्थी व पालकांची मोठी धांदल उडाली. त्याबद्दल अनेक पालकांनी नाराजीचा सूर आळवला. 'नीट' परीक्षेसाठी (NEET Exam) यावर्षी प्रथमच येथील श्रीगुरु बुद्धीस्वामी महाविद्यालय हे केंद्र नॅशनल टेस्टींग एजन्सीने निर्धारित केले होते. या केंद्रावर तीनशे परीक्षार्थी परीक्षा देण्याचे नियोजन झाले होते. प्राचार्य के.राजकुमार यांनी सर्व यंत्रणा सज्ज केली होती. परंतु नॅशनल टेस्टींग एजन्सीने परीक्षार्थींना दिलेल्या प्रवेश पत्रावर महाविद्यालयाचा अचूक पत्ता नोंदवला नव्हता. पूर्णा (Purna) रोड विद्यानगर, परभणी व परत त्यानंतर स्वल्पविराम देवून पूर्णा महाराष्ट्र असे संदिग्ध व गोंधळ निर्माण करणारे नमूद करण्यात आलेले होते. त्यामुळे अनेक परीक्षार्थी परभणीस गेले व तेथे चौकशी केल्यावर धावपळ करत पूर्णा येथे आले. त्यात त्यांची मोठी धावपळ झाली व त्यांना मनस्तापही झाला.

हेही वाचा: स्वादिष्ट मोदक खायचे, मग 'या' आहेत रेसिपीज्

दरम्यान मागील आठ दिवसांत ज्यांना पत्त्याबाबत संशय वाटला अशा अनेक परीक्षार्थींनी प्राचार्य के. राजकुमार यांना फोन करून पत्ता विचारला. त्यामुळे ते या धावपळीतून सुटले. एकंदरीत नॅशनल टेस्टींग एजन्सीच्या हलगर्जीपणाचा फटका पालक व परीक्षार्थीना बसला. त्यांना मानसिक त्रास व धावपळ सोसावी लागली एवढे मात्र निश्चीत. दरम्यान ३०० पैकी २८८ परीक्षार्थी निहीत वेळेत पोहोचले. त्यांनी परीक्षा दिली. १२ विद्यार्थी अनुपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाची थर्मल टेस्टींग करण्यात आली. अठरा दालनांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना सॅनिटायझर देण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व उपाययोजना करण्यात आल्या होत्या. सुरक्षेच्या पातळीवर मेटलडिटेक्टर व सीसीटीव्ही बसविण्यात आले होते. परीक्षेपूर्वी ध्वनीक्षेपकावरून मार्गदर्शनपर सूचना दिल्या जात होत्या, अशी माहिती केंद्रसंचालक प्रा.उमाकांत मिटकरी यांनी दिली. नॅशनल टेस्टींग एजन्सी दिल्लीचे केंद्र निरीक्षक प्रशांत बोंपीलवार, केंद्रसंचालक प्रा. उमाकांत मिटकरी, सहकेंद्रसंचालक प्रा. चारुदत्त डाफने यांच्यासह ३६ पर्यवेक्षकानी परीक्षा सुरळीत पार पाडली.

loading image
go to top