अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देणार ; अतुल सावे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Guardian Minister Atul Save

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देणार; अतुल सावे

जालना : जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतीचे नुकसान झालेल्या ठिकाणी पालकमंत्री म्हणून प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. परिस्थितीची पाहणी करून अहवाल सरकारला सादर करण्यात आला, शेतकऱ्यांना तातडीने कशी मदत पोहोचेल,यासाठी आपण विशेष प्रयत्न करणार आहे, असे पालकमंत्री अतुल सावे यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी ( ता.२८) जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. बैठकीनंतर पालकमंत्री सावे यांनी संवाद साधला. या वेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, माजीमंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर, आमदार नारायण कुचे, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार संतोष दानवे, जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री सावे म्हणाले, की जिल्ह्यात झालेल्या सततच्या पावसाने शेतातील पिके पाण्याखाली गेली. शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. ठिकठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन नुकसानीची पाहणी केली. पीक पाहणी दरम्यान अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले होते, असेही पालकमंत्री सावे यांनी सांगितले. अतिवृष्टीच्या परिस्थितीचा अहवाल सरकारला सादर करणार असून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत कशी मिळेल, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे श्री.सावे यांनी नमूद केले.

जिल्हा नियोजन बैठकीत विविध योजनांचा खर्च तपशील, काही कामांना स्थगिती देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. आर्थिक वर्ष २०२२- २३ मध्ये योजनांचा निधी खर्चाची तरतूद करण्यात येणार असून नोव्हेंबर अखेर लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या मागण्यांनुसार निधीची उपलब्धता करण्यात येईल. जिल्ह्यात विविध विभागात कामे सुरु आहेत,असे सांगून काही कामांना स्थगिती तर काही नवीन कामांना आठ दिवसात मान्यता दिल्या जातील, अशी माहिती पालकमंत्री सावे यांनी दिली.