esakal | Jalna: मुलींना दत्तक घेण्याचा कृतिशील आदर्श
sakal

बोलून बातमी शोधा

मुलींना दत्तक घेण्याचा कृतिशील आदर्श

जालना : मुलींना दत्तक घेण्याचा कृतिशील आदर्श

sakal_logo
By
सुहास सदाव्रते

जालना : शिक्षण सातवी पास, पुढे शाळा नव्हती म्हणून शिक्षण सोडावे लागले. लग्नानंतर शिक्षणाचा ध्यास घेत ‘गुरुकुल’ माध्यमातून अविरत कार्य करणाऱ्या विजया रामकिसन सोळुंके या दीपस्तंभ आहेत, हे विशेष. सत्तावीस वर्षांपासून कुठलेच शासकीय अनुदान नसताना आर्थिक भार स्वत पेलत आजही १७० मुलांची ‘आई’ होऊन सांभाळ करणाऱ्या विजयाताईचे कार्य अनन्यसाधारण असेच म्हणावे लागेल.

परतूर तालुक्यातील लिखित पिंपरी येथील संत तुकाराम गुरुकुल म्हणजे आधुनिक काळात समाज आदर्शाचा वस्तुपाठ होय. बालवाडीपासून ते दहावीपर्यंत सुरु झालेला ज्ञानयज्ञ अठ्ठावीस वर्षांपासून अविरत चालूच आहे.विशेष असे की,यासाठी कुठलेही शासकीय अनुदान मिळत नाही. गुरुकुल वसतिगृह म्हणून सुरुवात झालेली होती. आज साडेतीन एकराचा परिसर विजयाताईच्या श्रमाचा साक्षीदार म्हणून ओळखला जातो. गुरुकुलात २०११ ला स्त्री भ्रूण हत्या विषयावर जनजागृती करीत दत्तक योजना राबविण्यात आली होती. मुलींच्या पालकांना गुरुकुलात दत्तक योजनेत सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यावेळी १७ मुलींना दत्तक घेण्यात आले होते, असे विजयाताई सांगतात.

हेही वाचा: बाधितांंना मरणानंतरही छळले ः मसणवट्यावरून राजकारण पेटले

यातील एक ‘गौरी’ हिचे आगमन घटस्थापनेला गुरुकुलात झाले होते.याच मुलीला रामकिसन व विजयाताई यांनी दत्तक घेतले. आदर्शाचा वस्तुपाठ कृतीतून देणाऱ्या विजयाताई या आज १७० मुलांच्या आई म्हणून कर्तव्य बजावत आहेत. कोरोनाच्या दीड वर्षांपासून मुलांचा सांभाळ करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, अशा कामात कधी खचून गेले नाही, असेही अभिमानाने विजयाताई सांगतात. गुरुकुलाच्या उभारणीत स्वतःचे दागदागिने पणाला लावत लेकरांच्या जीवासाठीच काय ते सगळं, हे सांगताना विजयाताईना गहिवरून येतं. गुरुकुलाचा २०१४ पासून विद्यालयात बदल झाला. अनुदान मिळावे यासाठी सहा वेळेस प्रस्ताव सादर केला, परंतु आम्ही कोणाचा वशिला लावणार आणि पैसे तरी कसे देणार, यामुळेच शाळेला अनुदान मिळू शकले नसल्याची खंतही विजयाताई बोलून दाखवितात.

कोरोना संसर्गजन्य परिस्थितीत गुरुकुलात अनेक अडचणी आल्या होत्या, परंतु समाजातील दानशूर व्यक्तीनी मदत दिल्याचे सांगून, मी कधीच हताश झाले नसल्याचे विजयाताई सांगतात.

loading image
go to top