
जालना-जळगाव रेल्वेमार्गाचा हवाई ‘फायनल सर्व्हे’
जालना : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या पुढाकाराने रेल्वे मंत्रालयाच्या वतीने जालना-जळगाव रेल्वेमार्गाच्या अंतिम स्थळपाहणी सर्वेक्षणास फेब्रुवारी महिन्याच्या प्रारंभी मंजुरी मिळाली होती. त्यानुसार, भौतिकदृष्ट्या सर्वेक्षणाची प्रक्रिया सुरू आहे. आता या रेल्वेमार्गाचा शनिवारपासून या विमानाद्वारे रडारचा वापर करून ‘फायनल लोकेशन सर्व्हे’ केला जाणार आहे.
जालना-जळगाव रेल्वमार्ग व्हावा, अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून केली जात होती. त्यामुळे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी यासाठी सुमारे साडेचार कोटी रुपये मंजूर करून घेतले होते. फायनल लोकेशन सर्व्हे झाल्यानंतर हा स्वीकृतीसाठी रेल्वे बोर्डाकडे जाईल.
जालना-जळगाव रेल्वेमुळे मराठवाड्याच्या ग्रामीण भागातील औद्योगिक विकासासह, शेती, व्यापार, दळणवळण, लघुउद्योग, पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे. जालना येथून पिंपळगाव, पांगरी, राजूर, भोकरदन, सिल्लोड मार्गे गोळेगाव, अजिंठा, फर्दापूर, जळगाव असा ७० टक्के मार्ग जालना लोकसभा क्षेत्रातून जात आहे.
याचा फायदा पुढे सूरत, गुजरात, राजस्थानच्या रेल्वेगाड्यांना आंध्रप्रदेश, दक्षिण भारताकडे जाण्यासाठी छोटा मार्ग म्हणून होणार आहे. शिवाय अजिंठा हे पर्यटन स्थळ जगभरातील पर्यटकांसाठी रेल्वे प्रवासाची सोय होणार आहे. हा १७४ किलोमीटर लांबीचा रेल्वेमार्ग केला जाणार आहे. यासाठी भौतिकदृष्ट्या सर्वेक्षणाची प्रक्रिया सुरू आहे.शिवाय सोबतच कामाला गती येण्यासाठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली आता शनिवारपासून हवाई अंतिम स्थळ सर्वेक्षण केले जाणार आहे. यासाठी अकोला येथे विशेष विमानही दाखल झाले आहे.
दिवसाला ५० किलोमीटर सर्व्हे
विशेष विमान एका दिवसाला ५० किलोमीटरचा सर्व्हे करणार आहे. यामुळे फायनल लोकेशन सर्व्हेला गती मिळेल, असे रेल्वे राज्यमंत्री दानवे यांनी म्हटले आहे. ता. १४ ते ता. १७ मे या चार दिवसांत हे हवाई सर्वेक्षण होणार आहे.
Web Title: Jalna Jalgoan Railway Line Final Location Survey Four Day By Plane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..