esakal | jalna latest news crimes registered against 22 traders jalna covid 19 corona

बोलून बातमी शोधा

jalna news
जालन्यात २२ व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल, नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई
sakal_logo
By
प्रमोद सरवळे

जालना: मिनी लॉकडाउनला विरोध करत जिल्हा व्यापारी महासंघाच्या आवाहना प्रतिसाद देत आस्थापना सुरू ठेवलेल्या तब्बल २२ दुकानमालक, व्यापाऱ्यांवर सदर बाजार पोलिसांनी मंगळवारी (ता.१३) गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान, व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी सदर बाजार पोलिस ठाण्यात धाव घेत कारवाईस विरोध केला.

शासनासह प्रशासनाने जिल्ह्यात मिनी लॉकडाउन लागू केला आहे. या मिनी लॉकडाउनला व्यापारी महासंघाने विरोध करून सोमवारपासून (ता.१२) व्यापाऱ्यांना आस्थापना उघडण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देऊन आपआपल्या आस्थापना सुरू ठेवल्या. त्यानंतर पोलिस प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी व्यापाऱ्यांनी सुरू केलेल्या दुकानांचे छायाचित्र काढले होते.

तसेच मंगळवारी (ता.१३) ही अनेक व्यापाऱ्यांनी आस्थापना सुरू ठेवल्या. त्यामुळे पोलिसांनी दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. मात्र, अनेक व्यापाऱ्यांनी दुकाने बंद न केल्याने सदर बाजार पोलिसांनी मंगळवारी २२ दुकान मालकांवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत.

दरम्यान, सदर बाजार पोलिसांनी मंगळवारी दुकान बंद न केल्याने तीन ते चार व्यापाऱ्यांना पोलिस ठाणे येथे घेऊन गेले. त्यानंतर जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष विनीत सहानी यांच्यासह पदाधिकारी पोलिस ठाण्यात पोहचले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आमदार कैलास गोरंट्याल हे देखील सदर बाजार पोलिस ठाण्यात दाखल झाले. त्यामुळे सर्वत्र एकच गोंधळ उडाला होता.

जिल्हाधिकारी यांनी लागू केलेल्या आदेशाचे उल्लंघन करून ज्या व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू केल्या, अशा दुकानदारांवर नियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले आहे. या पुढेही जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने सुरू ठेवल्यास गुन्हे दाखल केले जातील. - संजय देशमुख, (पोलिस निरीक्षक सदर बाजार, जालना)

प्रशासनाला सहकार्य करण्याची आमची कायम भूमिका आहे. मात्र, व्यापारी ही त्रस्त झाला आहे त्याचा विचारही शासनासह प्रशासनाने करावे. प्रशासनाला सहकार्य करीत पुढील काही दिवस व्यापारी आपल्या आस्थापना उघडणार नाहीत. - विनीत सहानी, (जिल्हाध्यक्ष, जिल्हा व्यापारी महासंघ, जालना)