Jalna : घनसावंगीकरांसाठी ऐतिहासिक ४२ वे मराठवाडा साहित्य संमेलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंबड

Jalna : घनसावंगीकरांसाठी ऐतिहासिक ४२ वे मराठवाडा साहित्य संमेलन

घनसावंगी : घनसावंगी तालुक्‍याला ऐतिहासिक व साहित्यिक वारसा लाभलेला आहे. या साहित्यिकांच्या मांदियाळीत घनसावंगी येथे संत रामदास महाविद्यालयाच्या परिसरात मराठवाडा साहित्य परिषदेचे ४२ वे मराठवाडा साहित्य संमेलन सुरू झाले असून ऐतिहासिक मेजवानीने घनसावंगीकर सुखावले आहेत. आद्य कवयित्री महदंबा यांच्या जन्म आणि कर्मभूमीत हे दोन दिवसीय साहित्य संमेलन सुरू झाले आहे.

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्‍यातून विभक्त झाल्या नंतर घनसावंगी तालुक्‍याची ओळख मिळालेले घनसावंगी शहर हे जिल्ह्याच्या निर्मितीचे केंद्र बिंदू आहे. घनसावंगीत पहिल्यांदाच साहित्य संमेलन होत आहे. हा घनसावंगीकरांसाठी सुवर्णक्षण आहे. इथल्या माणसांसह साहित्यिक, कवी, श्रोता रसिक, लेखक वक्त्यांसाठी अतिशय आनंददायी क्षण आहे. तसा घनसावंगी गावाला मोठा इतिहास आहे. तालुका, विधानसभेचा मतदारसंघ इतकीच ओळख असली तरी येथे पुरातन जागृत असे नृसिंहाचे मंदिर आहे.

राष्ट्रकूट घराण्यातील शासकाने त्याची निर्मिती केली असावी असा पुरातत्त्वीय अवशेषावरून अंदाज येतो. मयूरखिंडी ताम्रपटात या परिसराचा उल्लेख असून राक्षसभूवनच्या लढाईनंतर घनसावंगीत स्थिरावलेल्या जाधवराव देशमुख घराण्याचा येथे अंमल वाढला असावा. मराठवाडा मुक्ती आंदोलनादरम्यान इथली सर्व कागदपत्रे अर्थात मूळ रेकॉर्ड हैदराबाद येथील संग्रहालयात असल्याने बराच इतिहास त्या कागदपत्रांत दडलेला असून ढाकेफळ येथे चक्रधर स्वामी यांचे वास्तव्य, नाथ संप्रदायातील मच्छिंद्रनाथांचे चिचोंली येथे, तर पुढे गोरक्षनाथ टेकडी येथे गोरक्षनाथांचे वास्तव्य होते.

सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या वहिवाटीचा अंमलही येथे होता. याच भूमीत जन्माला आलेले समर्थ रामदास स्वामी, मराठीच्या आद्यकवयित्री महदंबा, जवळील आष्टी येथे लक्ष्मण महाराज यांनी या परिसराला ऐतिहासिक वारसा व साहित्य दिले आहे. या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून स्वागताध्यक्ष शिवाजी चोथे यांनी यथाशक्ति प्रयत्न करून या साहित्यिकांच्या

विचारांना प्रखरतेने समोर आणले आहे. गोदावरी नदी दक्षिण गंगा असून या गंगेच्या साक्षीने ६४ कलांच्या साहित्य, संगीत, काव्य आविष्काराचे सादरीकरण साहित्य संमेलनाच्या मंचावरून झाले आहे.

ख्यातनाम साहित्यिक, कवी-कवयित्री, लेखक आपले विषय जोरदारपणे मांडत आहेत. दोन दिवस हा साहित्य सोहळा चालणार आहे. या संमेलनाचे उदघाटन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व साहित्यिक डॉ.शेषराव मोहिते यांच्या अध्यक्षतेत झाले असून घनसावंगीकर पहिल्यांदा अशा या सोहळ्याने भारावून गेले आहेत.