Jalna : कर्णबधिर लेकराची साद ऐकणारी माय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalna

Jalna : कर्णबधिर लेकराची साद ऐकणारी माय

जालना : संसाराच्या वेलीवर फुल उमलले...परंतु नियतीने जन्मताच मुलाला ऐकू येत नव्हते... डॉक्टराच्या भाषेत मुलगा कर्णबधिर असल्याचे समजले... तेथून सुरु झालेला हा बावीस वर्षांचा प्रवास आता एका ध्येयाच्या वळणावर आहे. आईची जिद्द, प्रबळ आत्मविश्वास आणि संकटाला सामोरे जाण्याचे धाडसाने मुलगा बीई संगणक झाला. कर्णबधिर लेकराची साद ऐकणारी ही माऊली आहे अर्चना नागेश पिंपरकर.

शहरातील सहकार बँक कॉलनीतील अर्चना व नागेश पिंपरकर या दाम्पत्यांचा पहिला मुलगा सौरभ आहे. सौरभ हा अडीच- तीन वर्षांचा असताना त्याला काहीच ऐकू येत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. एक ना अनेक दवाखान्यात दाखविले. एका दवाखान्यात दाखविल्यानंतर मुलाच्या दोन्ही कानाचा ९० डेसिबल श्रवण ऱ्हास झालेला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मग हार न मानता जिद्दीने उपचार केले. तीन महिन्यांपूर्वी सौरभने संगणक अभियंता शाखेची पदवी प्राप्त केली आहे. क्रिटिकल एजमध्ये स्पीच थेरपी घेतल्यामुळे,

श्रवणयंत्र डिजिटल नियमित वापरामुळे सर्वसामान्य शाळेत सर्वसामान्य मुलांबरोबर सर्वसमावेशक असे शिक्षण त्याने पूर्ण केले. मुलाने चांगले शिक्षण घ्यावे, या ध्यासाने जिद्द, आत्मविश्‍वासासह अर्चना यांनी परिश्रम घेतले. परिणामी नुकतीच मुलाने संगणक अभियांत्रिकीमध्ये पदवी घेतली. बावीस वर्षांच्या संघर्षाला एक निर्णायक वळण मिळाले. अर्थात आपल्या मुलाने मोठ्या पदावर ‘साहेब’ व्हावे,असे प्रत्येक आईचे स्वप्न असते. कर्णबधिर मुलाला आयुष्यात इतर मुलांप्रमाणे उभे करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अर्चना पिंपरकर दक्ष राहतात.

सध्या सौरभला स्पर्धा परीक्षेचा वर्ग लावण्यात आला आहे. पुण्याला एमपीएससी स्पर्धा परीक्षेला मुलाला पाठवायचे आहे. मुलगा जरी कर्णबधिर असला तरी सर्वसामान्य मुलांबरोबर तो मशीनच्या माध्यमातून संवाद साधू शकतो. असामान्य स्थितीतून सर्वसामान्य स्थितीत लेकराला आणणारा या माऊलीचा प्रवास अनेकींना प्रेरणादायी ठरत आहे.