esakal | रेशीम कोषास विक्रमी 51 हजार भाव; शेतकरी आणि खरेदीदारांचा सत्कार
sakal

बोलून बातमी शोधा

jalna

रेशीम कोषास विक्रमी 51 हजार भाव; शेतकरी आणि खरेदीदारांचा सत्कार

sakal_logo
By
उमेश वाघमारे

जालना : जालना कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत सुरू असलेल्या रेशीम मार्केटमध्ये गुरुवारी ( ता .दोन) रेशीम कोषास खरेदी हंगामातील सर्वात विक्रमी 51 हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला आहे. जालना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अर्जुन खोतकर यांच्या पुढाकाराने जालना कृषी उत्पन्न बाजार समिती येथे रेशीम कोष खरेदी केंद्र सुरू केले आहे. त्यामुळे मराठवाड्यासह विदर्भ, खानदेश आणि अहमदनगर जिल्ह्यातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांकडून जालना येथे रेशीम कोष विक्रीसाठी आणत आहेत. चालू आर्थिक वर्षात ता.एक एप्रिल ते आजपर्यंत 1471 शेतकऱ्यांनी 139 टन रेशीम कोष विक्री केली असून चार कोटी 97 लाख रक्कम रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना प्राप्त झाली आहे.

हेही वाचा: स्वातंत्र्य कुणासाठी आणि कशाचे?

गुरूवारी (ता.दोन) धामणगाव (ता. फुलंब्री जि. औरंगाबाद ) येथील शेतकरी सोमीनाथ कणसे यांच्या कोषास विक्रमी असा 51 हजार रुपये प्रती क्विंटल भाव मिळाला. त्यांच्यासह खरेदीदार इम्रान पठाण यांचा जालना कृषी उत्पन्न बाजार समिती तर्फे बाजार समितीचे संचालक विष्णू चंद, सचिव रजनीकांत इंगळे, रेशीम अधिकारी अजय मोहिते, यांनी सत्कार केला. या वेळी बाजार समितीचे मोहन राठोड, अशोक कोल्हे, राहुल तायडे, गजानन जऱ्हाड , किशोर गोल्डे, संजय छबीलवाड, प्रफुल्ल हिवरेकर, प्रसाद काकडे, हार्दिक फलके, संजय जाधव, विश्वंभर गिरी रेशीम कार्यालयाचे भरत जायभाये, गणेश कड यांच्यासह रेशीम कोष उत्पादक शेतकरी, खरेदीदार यांची उपस्थिती होती.

हेही वाचा: मालकाचे पैसे बुडविण्यासाठी पोटच्या गोळ्याचा खून

सोन्यासारखा दर मिळत असल्याचे समाधान : अर्जुन खोतकर

पारंपरिक पिकांसोबतच हमखास उत्पन्न देणारे पीक म्हणून रेशीम कोष लागवडीकडे शेतकऱ्यांचा वाढता कल लक्षात घेता रेशीम खात्याचे मंत्री असतांना जालना कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात रेशीम मार्केट कार्यान्वित केले.रेशीम उत्पादक शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद पाहता आज मितीस देशात रामनगरनंतर ( कर्नाटक) दुसऱ्या क्रमांकाची बाजार पेठ म्हणून नावारूपास येत आहे. या सोबतच सोन्याच्या तोडीचा भाव शेतकऱ्यांना मिळत असल्याने आपल्या प्रयत्नांचे फलित होत असल्याची भावना जालना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केली. तथापि शेतकऱ्यांनी रेशीम कोष विक्रीसाठी आणावेत, असे आवाहनही श्री. खोतकर यांनी केले आहे.

रेशीमच्या मागणीत वाढ

यंदा चीनमध्ये पूरग्रस्त परिस्थिती उद्भवल्याने तेथील रेशीमचे उत्पादन घटले तर भारतात झालेले अनलॉक यामुळे प्रक्रिया उद्योग सुरु झाल्यानंतर एकदमच रेशीमच्या मागणीत मोठी वाढ झाली. 100 अंडी कोषात शेतकरी सरासरी 80 ते 90 किलो उत्पादन घेत आहेत. रेशीम कोष हे शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे.

- अजय मोहिते, जिल्हा रेशीम अधिकारी

loading image
go to top