जालना : विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी

शहागड परिसरातील चित्र, जिल्ह्यात ठिकठिकाणी ढगाळ वातावरण
Jalna Shahagad Rainfall with lightning
Jalna Shahagad Rainfall with lightning sakal

शहागड : अंबड तालुक्यातील शहागड, अंकुशनगर कारखाना परिसरात रविवारी विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळल्या. शहागड परिसरात रविवारी सायंकाळनंतर आकाशात ढग दाटून आले होते. त्यातच रात्री पावसाच्या सरी कोसळल्या. औरंगाबाद-बीड राष्ट्रीय महामार्गावरील दुचाकीस्वारांची तसेच पादचाऱ्यांची पावसामुळे चांगली तारांबळ उडाली. पावसापासून बचावासाठी अनेकांनी इमारतींचा आडोसा घेतला.

दरम्यान, परिसरात नुकत्याच लागवड झालेल्या कपाशीला पाण्याची अत्यंत आवश्यकता असल्याने शेतकऱ्यांची डोळे आकाशाकडे लागले आहेत. त्यातच पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. आता जोरदार पावसाची गरज आहे.

ठिकठिकाणी रिमझिम

परतूर शहरात रविवारी रात्री पावसाची रिमझिम झाली. घनसावंगी शहरात काही वेळ पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. तीर्थपुरी शहरातही काही वेळ पावसाने हजेरी लावली. दरम्यान, जिल्ह्यात ठिकठिकाणी ढग दाटून आलेले होते.

बदनापूर परिसरात ढगाळ वातावरण

बदनापूर : तालुक्यात पाऊस ओढ देत आहे. त्यामुळे खरीप पेरणी केलेल्या शेतकऱ्यांत कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. दररोज ढगाळ वातावरण निर्माण होत असले तरी त्याचे रूपांतर पावसात होत नसल्याची विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, रविवारी पहाटे पासून ढगाळ वातावरण होते. त्यात वाराही वाहत नसल्यामुळे कमालीचा उष्मा जाणवत होता. त्यामुळे नक्की पाऊस होईल, अशी भाबडी आशा शेतकऱ्यांसह सर्वांनाच होती. अर्थात दुपारी साडेबारा वाजता बदनापूर शहरासह परिसरात हलक्या पावसाला सुरवात झाली. पाऊस आपला वेग वाढवेल, असे वाटत असताना अवघ्या काही मिनिटात आभाळ निरभ्र होऊन ऊन पडले. आणि पाऊस पुन्हा एकदा गायब झाला. तालुक्यात मागच्या दोन वर्षात खरीप हंगामाच्या अगदी योग्यवेळेत पाऊस झाला. हाच अनुभव गाठीशी धरत जवळपास ५५ ते ६० टक्के शेतकऱ्यांनी कापूस लागवड आणि खरीप पेरण्या उरकल्या आहेत. मात्र मागील काही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने शेतकरी पुरते हवालदिल झाले आहेत.

भोकरदन परिसरात नुसते ढग

भोकरदन शहरासह परिसरात रविवारी ढगाळ वातावरण होते. दिवसभर शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या होत्या. यंदा तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी धूळपेरणी केलेली असल्यामुळे पाऊस पडणे गरजेचे आहे. सूर्याचा ता. आठ जूनला मृग नक्षत्र प्रवेश झाला होता. आता हे नक्षत्र सरण्याच्या स्थितीत असूनही पावसाला जोर नाही. बुधवारी सूर्याचा आर्द्रा नक्षत्रात प्रवेश होईल. त्यामुळे किमान पुढील काही दिवस चांगला पाऊस पडावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com