Jalna : छेडछाडीबाबत ‘सायलेंट मोड’ कशाला? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalna

Jalna : छेडछाडीबाबत ‘सायलेंट मोड’ कशाला?

जालना : शाळा-महाविद्यालय असो,की शासकीय कार्यालयात युवती-महिलांच्या छेडछाड, छळ रोखण्यासाठी ‘विशाखा समिती, दामिनी पथक’ आहेत. परंतु शहरात दामिनी पथकाशी संपर्क केला जात नाही, विशाखा समितीत तक्रार करण्यास युवती येत नसल्याचे अनुभव आहेत. परिणामी, छळासह छेडछाडीबाबत अनेकींच्या ‘सायलेंट मोड’मुळे दामिनी पथक थंडावलेले तर अनेक शासकीय कार्यालयात विशाखा समिती कागदावरच असल्याचे चित्र आहे.

शहरातील महत्त्वाची ठिकाणे,शाळा महाविद्यालय, कोचिंग क्लासेस, मंदिर परिसरात युवती आणि महिलांची छेड काढण्याचे प्रकार घडतात. असे प्रकार घडत असले तरी आपण कुणाकडे तक्रार करावी,कुणाला सांगावे, लोक काय म्हणतील असा विचार करीत मानसिक त्रास सहन करणाऱ्या युवतींच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे जाणकारांचे निरीक्षण आहे. अर्थात कौटुंबिक वातावरण,पालक आणि मुलांचा सुसंवाद, मानसिक आधार असेल तर घटनांवर नियंत्रण ठेवता येऊ शकते,असा सल्ला समुपदेशक देतात.

विशाखा समिती कागदावर?

शासकीय कार्यालयात महिलांच्या तक्रारी व छेडछाडीबाबत विशाखा समिती असते. परंतु बहुतांश कार्यालयात विशाखा समिती कामकाज केवळ कागदोपत्री नोंदी घेण्यासाठी असते,की काय अशी परिस्थिती असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या रसना देहेडकर यांनी सांगितले. विशाखा समितीत किती तक्रारी आल्या,किती प्रकरणे निकाली निघाली यासह किती पुरुषांवर गुन्हे दाखल झाले,याची साधी माहिती मिळू शकत नाही,असा एका महिला विधिज्ञ यांना अनुभव आला आहे. शासकीय कार्यालयाबरोबर वरिष्ठ महाविद्यालयात विशाखा समिती असते. परंतु कागदावरच समिती असल्याचे दिसून येत आहे.

दामिनीचा तिघांवर कारभार

रोडरोमिओंच्या बंदोबस्तासाठी आणि विद्यार्थिनी सुरक्षित व निर्भय वातावरण निर्माण करून देण्याचे काम दामिनी पथकाकडून केले जाते. मात्र, जिल्ह्यातील दामिनी पथकाचा एक अधिकारी आणि दोन महिला कर्मचारी असा तिघांवर भार आहे. शिवाय दामिनी पथक प्रमुखांकडे दुसऱ्या एका विभागाचाही अतिरिक्त पदभार आहे. त्यामुळे शहरासह जिल्ह्यात दामिनी पथक रस्त्यावर दिसत नाही. परिणामी रोडरोमिओंनाही आता दामिनी पथकांचा धाक राहिलेला नाही.

इनरव्हील क्लबची जनजागृती

शहरातील इनरव्हील क्लबतर्फे जनजागृती करण्यात येत आहे. यात क्लबतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात जनजागृतीसाठी ‘लैंगिक छळ एक दंडनीय अपराध’, ‘शून्य सहिष्णुता छळ धोरण’, छेडछाडीसह छळ रोखण्याबाबत कायद्यातील तरतूद आदींबाबत पोस्टर तयार करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी अंजली कानडे यांच्या उपस्थितीत पोस्टरचे अनावरण करण्यात आले. इनरव्हील क्लब पदाधिकारी अश्विनी धन्नावत यांच्यासह पदाधिकारी विविध ठिकाणी पोस्टर माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. इनरव्हील क्लब अध्यक्षा अमृता मिश्रीकोटकर, सचिव दीपाली पाटणी, कोषाध्यक्ष उर्वशी खंडेलवाल, अश्विनी धन्नावत यांच्यासह पदाधिकारी पोस्टर माध्यमातून जनजागृती करत आहेत.

दामिनी’चा प्रभाव दिसेना

शाळा-महाविद्यालये, सार्वजनिक ठिकाणी युवतीची छेडछाड होऊ नये यासाठी पोलिस प्रशासनाचे दामिनी पथक असते. परंतु सध्या दामिनी पथक सायलेंट मोडवर असल्याचे दिसून येते. शहरात कोचिंग क्लासेस, मंदिरे, सार्वजनिक ठिकाणी छेडछाड घटना घडतात. शाळा महाविद्यालय सुटल्यावर टवाळखोर मुले छेडछाड करण्याचे प्रकार घडतात. ‘लोक काय म्हणतील’ अशा भीतीने तक्रार करण्यात पुढे येत नाहीत. खरेतर दामिनी पथकाचा प्रभावच शहरात दिसून येत नसल्याने अशा घटनांना पायबंद कसा घालणार असा सवाल उपस्थित होत आहे.

तिचा’ फोटोच ठेवला डीपी

शहरातील एका नामांकित वरिष्ठ महाविद्यालयात नुकतीच एक घटना घडली. महाविद्यालयात एका युवकाने त्याच्या वर्गातील विद्यार्थिनीचा फोटो स्वतःच्या मोबाईल स्टेटस आणि डीपीवर ठेवला होता. मित्रांच्या व्हॉट्सअप समूहावर एका मैत्रिणीला हे लक्षात आले. तिने संबंधित युवतीस सांगितले. ज्या मुलीचा फोटो स्टेटस ठेवला तिला क्षणात काय करावे सुचेना. माझा फोटो कसा ठेवला या विचाराने ती अस्वस्थ झाली.घाबरून गेली आणि घरचे काय म्हणतील या विचाराने अस्वस्थ झाली. महाविद्यालयात याची चर्चा झाली, तेव्हा घडलेला प्रकार युवतीने सांगितला. संबंधित युवकास चांगली समज देण्यात आली. सदर युवती आणि तिचे पालक यांचे समुपदेशन करण्यात येत आहे.

.तर कारवाई आणि शिक्षा

सार्वजनिक ठिकाणी किंवा शासकीय कार्यालयात महिलेची छेडछाड केल्यास कलम ३५४ नुसार कारवाई होते. कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ झाल्यास संबंधितावर ‘पॉश’ कायदा २०१३ नुसार गुन्हा दाखल केला जातो. जबरदस्ती किंवा शारीरिक संबंधासाठी कलम ३७६ नुसार गुन्हा दाखल होतो. शिवाय गुन्हा सिद्ध झाल्यास शिक्षाही होते.