जालना : चोरीच्या बारा दुचाकी जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalna Twelve two wheeler theft

जालना : चोरीच्या बारा दुचाकी जप्त

जालना : जालना शहरासह जिल्ह्यात दुचाकी चोरांचा सुळसुळाट सुरू आहे. मात्र, हे दुचाकी चोर पोलिसांच्या हाती लागण्यास तयार नाही. अशात अंबड पोलिसांनी दोन भामट्यांना अटक करून त्यांच्याकडून चार लाखांच्या चोरीच्या तब्बल बारा दुचाकी जप्त केल्या. विशेष म्हणजे या दुचाकी राज्यातील विविध जिल्ह्यांमधून चोरी केल्याचे पुढे आले आहे.

जालना शहरासह जिल्ह्यात जवळपास प्रत्येक दिवसाला दुचाकी चोरीचा गुन्हा नोंद होत आहे. अशातच अंबड पोलिसांनी दोन दुचाकी चोऱ्यांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून चोरीच्या १२ दुचाकी जप्त करण्यात आल्या. त्या राज्यातील विविध भागांतील आहेत. ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ नरके, पोलिस उपनिरीक्षक योगेश चव्हाण, सहायक पोलिस उपनिरीक्षक एम.बी.स्कॉट, पोलिस कर्मचारी विष्णू चव्हाण, मनजित सेना, दीपक पाटील, संदीप जाधव, स्वप्नील भिसे, अरुण लहाने, वंदन पवार व स्थानिक गुन्हे शाखेचे सागर बाविस्कर यांनी केली.

अशी केली कारवाई

किनगाव चौफुली भागात एक व्यक्ती चोरीची दुचाकी विक्रीसाठी आणणार असल्याची माहिती अंबड तालुका पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ नरके यांना मिळाली. त्यानुसार नरके यांनी सापळा लावला. यावेळी संशयित विना क्रमांकाच्या दुचाकीवर येताना दिसून आला. पोलिसांनी थांबविले. त्याच्याकडे चौकशी केली असताना त्याने हरी शिवदास वंजारी (रा. वलखेड, ता.अंबड, जि. जालना) असे नाव सांगितले. त्याच्याकडे दुचाकीची कागदपत्रांची विचारणा केली. पण, त्याने उडवाउडवीचे उत्तरे देऊन कागदपत्रे नसल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर ही दुचाकी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरी केल्याचे पुढे आले. त्यानंतर अधिक विचारपूस केल्यानंतर साथीदार रामा लक्ष्मण जाधव (रा. उमापूर) याच्या मदतीने अनेक ठिकाणहून दुचाकी चोरी केल्याची कबुली त्याने दिली.

अशी केली कारवाई या ठिकाणहून चोरी

या दोघांनी जालना, औरंगाबाद, नगर, बुलडाणा, मुंबई व इतर विविध शहरांतून बनावट चाव्यांचा वापर करून दुचाकींची चोरी केल्याची कबुली दिली. अंबड पोलिसांनी या प्रकरणात हरी शिवदास वंजारी आणि रामा लक्ष्मण जाधव यांना अटक केली. या दोघांकडून ताब्यातून तब्बल बारा दुचाकी जप्त केल्या आहेत. त्यांची किमत सुमारे चार लाख रुपये आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करीत आहे.