
जालना : पिस्तूल दाखवून व्यापाऱ्यास लुटले
जालना : शहरात गोल्डन ज्युबली शाळेच्या समोर एका व्यापाऱ्याला अडवून गावठी पिस्तुलाचा धाक दाखवत बेदम मारहाण करून लुटल्याचा प्रकार सोमवारी रात्री आठ वाजेच्या दरम्यान घडला आहे. अमित अग्रवाल असे या व्यापाऱ्याचे नाव असून तब्बल सहा लाख ९२ हजार रुपये लंपास झाल्याचे पोलिसांकडून प्राथमिक माहिती देण्यात आली आहे.
शहरातील नवीन मोंढा परिसातील तिरुपती ट्रेडर्सचे मालक अमित अग्रवाल सोमवारी रात्री दुकान बंद करून स्कुटीवर सहा लाख ९२ हजार रुपये घेऊन घरी निघाले होते. शहरातील गोल्डन ज्युबली शाळेसमोर आल्यानंतर सोमवारी रात्री पावणेआठ ते आठ वाजेच्या दरम्यान दुचाकीवरून आलेल्या तीन संशयितांनी त्यांना अडविले. त्यानंतर एका संशयिताने त्यांच्या पायावर लोखंडी गजाने मारहाण केली. शिवाय गावठी पिस्तुलाचा धाक दाखवून स्कुटीसह डिकीतील सहा लाख ९२ हजारांची रोकड घेऊन तिघेही पसार झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आले आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी निरज राजगुरू, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग , बाजार पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर पायघन यांच्यासह पोलिस अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे दोन तर सदर बाजार पोलिस ठाण्याचे तीन असे पाच पथक शोधकार्यासाठी रवाना झाले. रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून संशयितांचा शोध सुरू होता. या प्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू होती.
वाटमारीच्या घटनांमध्ये पुन्हा होतीय वाढ
जालना-मंठा रोडवरील राममूर्ती शिवारात शुक्रवारी रात्री अभिजीत दुसाने या सराफा व्यापाऱ्याला गावठी पिस्तुलधारी तीन व्यक्तींनी डोळ्यात मिरचीची पावडर टाकून लुटले होते. यात सात तोळे सोने आणि ९० हजार रोख रक्कम लुटण्यात आली होती. हा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेने बुधवारी उघड करून चार संशयितांना पकडलेही होते. त्यानंतर अकरा दिवसांच्या अंतरावर पुन्हा व्यापाऱ्याला शहरातील भररस्त्यात लुटण्याचा प्रकार सोमवार घडला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Web Title: Jalna Trader Beating Robbery Obstructing Case With Gun
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..