Jalna : ऊस वाहतुकीच्या वाहनांना शिस्त लावणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

jalna

Jalna : ऊस वाहतुकीच्या वाहनांना शिस्त लावणार

जालना : गाळपाचा हंगाम सुरू झाला की वर्दळीच्या महामार्गाच्या मध्यभागातून संथगतीने जाणाऱ्या ऊस वाहतुकीच्या वाहनांमुळे अपघाताचे प्रकार वाढतात. यात अनेकांनी जीव गमवावा लागतो. वाहनांचे नुकसान होते. रहदारीला अडथळा येतो. त्यामुळे उपप्रादेशिक परिवहन विभाग आता ऊस वाहतुकीच्या वाहनांना शिस्त लावणार आहे. याबाबत कारखाना व्यवस्थापनाला विभागाकडून विविध सूचना करण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यात दरवर्षी पाच साखर कारखान्यांचा गळीत हंगाम होतो. यामध्ये अंबड तालुक्यातील अंकुशनगर येथील कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर, घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथील सागर सहकारी साखर कारखाना, भोकरदन तालुक्यातील श्री. रामेश्‍वर सहकारी साखर कारखाना तसेच घनसावंगी तालुक्यातील देवीदहेगावच्या रेणुकानगर येथील समृद्धी शुगर्स, परतूर तालुक्यातील माँ बागेश्‍वरी श्रद्धा एनर्जी अशा पाच साखर कारखान्यांचा समावेश आहे. गळीत हंगाम सुरू होताच ट्रक, ट्रॅक्टर आणि टायरगाड्यांमधून शेतातील ऊस तोडून साखर कारखान्यापर्यंत आणला जातो.

मात्र गाळपाच्या हंगामकाळात रात्री ऊस वाहतूक करताना अपघात सतत घडतात. त्यातही रस्त्यावरून जाणारी ही वाहने रात्री जवळ येऊनही चालकांना दिसत नाहीत. कार, दुचाकी, ट्रक, छोटी वाहने परिणामी थेट ऊसतोड करणाऱ्या वाहनांना धडकतात. यात ऊस वाहतूक करणाऱ्या मजुरांचा जीव धोक्यात येतो. शिवाय धडक देणाऱ्या वाहनांतील प्रवासीही जखमी होण्याचे प्रकार घडतात, शिवाय वाहनांचे मोठे नुकसान होते.

अनेकदा मुक्या जनावरांचा जीव जातो. ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत, टायरगाड्यांमध्ये अनेकदा क्षमतेपेक्षा जास्त ऊस भरलेला असतो, त्यामुळे अशी वाहने नियंत्रणात आणणेही चालकास कठीण जाते. परिणामी रस्त्याच्या मध्यभागावरून ही वाहने कारखान्याकडे मार्गक्रमण करतात. सध्या जिल्ह्यातील अनेक महामार्गाचे रुंदीकरण, सिमेंट काँक्रीटीकरण झालेले आहे. परिणामी रहदारी वाढली आहे. वाहनांचा वेग वाढलेला आहे. अशावेळी रस्त्यावर ऊस वाहतुकीचे ट्रॅक्टर, टायरगाड्या आल्यास आणीबाणीची स्थिती होते. ही बाब लक्षात घेऊन अपघात रोखण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. विभाग शून्य अपघात मोहीम राबवीत आहे.

त्यात, ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर, टायरगाड्यांना पुढील तसेच पाठीमागील बाजूला कापडी रिफ्लेक्‍टर बसविण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. कारखाना व्यवस्थापनास असे कापडी रिफ्लेक्टर उपलब्ध करून देण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. मोठी रहदारी असलेले राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्गावरून ऊस वाहतुकीच्या टायरगाड्या, ट्रॉल्या नेण्याऐवजी पर्यायी रस्त्यांचा वापर करण्याबाबत चाचपणी केली जात आहे. महामार्गानजीकच्या सर्व्हिस रोडचाही वापर करण्याबाबत सूचना केल्या जाणार आहेत.

उपप्रादेशिक परिवहन विभाग व कारखाना व्यवस्थापनात समन्वय राहण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपही तयार करण्यात आला आहे. ऊस वाहतुकीच्या टायरगाड्या, ट्रॉल्या यांना कापडी रिफ्लेक्टर लावण्याबाबत बंधनकारक केले जाणार असून पुढील आठवड्यामध्ये यासंदर्भात आदेशही काढले जाणार आहेत. याशिवाय बेशिस्त वाहनांवर कारवाईही करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात ऊस वाहतूक ट्रॅक्टरसह टायरगाड्यांचे अपघात टाळण्यासाठी जिल्ह्यात बारामतीच्या धर्तीवर शून्य अपघात मोहीम राबविण्यास सुरवात झाली आहे. ऊस ट्रॅक्टरसह टायरगाड्यांवर तीन बाय तीन मीटरचे कापडी रिफ्लेक्टर लावण्यासंदर्भात साखर कारखान्यांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. पुढील आठवड्यात यासंदर्भात आदेशही काढले जाणार आहेत.

- विजय काठोळेउपप्रादेशिक अधिकारी, जालना.