Jalna News: शेतातील टरबुजाची कवडीमोल दरात विक्री ; गारपीट, पावसाच्या भीतीमुळे शेतकऱ्यांचा नाइलाज Jalna watermelons prices Sale farmers are helpless | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेतकरी

Jalna News: शेतातील टरबुजाची कवडीमोल दरात विक्री ; गारपीट, पावसाच्या भीतीमुळे शेतकऱ्यांचा नाइलाज

वडीगोद्री : अंबड तालुक्यातील वडीगोद्री परिसरात ढगाळ वातावरण व बेमोसमी पावसामुळे टरबूज उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. गारपीट, पावसाच्या भितीमुळे अनेक शेतकरी शेतातील टरबुजाची व्यापाऱ्यांना कवडीमोल दरात विक्री करताना दिसून येत आहे.

ढगाळ वातावरणामुळे आधीच बाजारपेठेत टरबुजाच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झालेली आहे. त्याचा फटका टरबूज उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. या भागात चार दिवसापासून ढगाळ वातावरण व पावसाचे वातावरण आहे.

त्यातच कमी-जास्त प्रमाणात पाऊस पडत आहे. या बेमोसमी पावसाचा फटका काढणीस आलेल्या टरबूज पिकांना बसण्याची भिती व्यक्त होत आहे, त्यामुळे शेतकरी कमी भावात व्यापाऱ्यांना टरबूज विक्री करताना दिसत आहेत.

शेतकऱ्यांनी टरबूज पिकासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे. तो केलेला खर्च तरी निघावा यासाठी शेतकरी लगबग करत आहे.

ढगाळ वातावरणामुळे टरबूज पिकांवर चिकटा, नागआळी, जिवाणुजन्य बुरशी या रोगांचा प्रादुर्भाव पडत आहे. बेमोसमी पावसामुळे शेतकरी काढणीस आलेल्या टरबुजाची कवडीमोल भावात व्यापाऱ्यांना विक्री करत आहेत.

— पंकज पवार शेतकरी, वडीगोद्री

गेल्या आठ दिवसापूर्वी बाजारपेठेत टरबुजाला किलोला नऊ ते दहा रुपये प्रमाणे भाव होता. मात्र या बेमोसमी वातावरणामुळे टरबुजाचे भाव घसरले आहेत. ते सध्या सात किंवा आठ रुपये किलो प्रमाणे आहेत.

— अनिस खान व्यापारी, अंबड