जालना : अरे बाप रे ! हल्ल्यात वासराचा मृत्यू, वाचा वनविभागाने काय केले....!

चक्रधर नाटकर  
Sunday, 14 June 2020

अंबड तालुक्यातील कुरण परिसरातील शेतवस्‍तीवर शनिवारी (ता.१३) रात्री वन्यप्राण्याने गोठ्यातील जनावरांवर हल्ला केला. या हल्यात एका वासराचा मृत्यू झाला आहे. पावसामुळे वन विभागाच्या अधिकाऱ्यांना ठशावरून प्राण्याचा अंदाज घेण्यास अडचण होत असल्याने वाईल्ड लाईफ अधिकाऱ्यांकडे हे ठसे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.

शहागड : अंबड तालुक्यातील कुरण परिसरातील शेतवस्‍तीवर शनिवारी (ता.१३) रात्री वन्यप्राण्याने गोठ्यातील जनावरांवर हल्ला केला. या हल्यात एका वासराचा मृत्यू झाला आहे. पावसामुळे वन विभागाच्या अधिकाऱ्यांना ठशावरून प्राण्याचा अंदाज घेण्यास अडचण होत असल्याने वाईल्ड लाईफ अधिकाऱ्यांकडे हे ठसे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.

कुरण शिवारात वस्तीवर राहणारे शेतकरी कचरु काळे यांच्या गोठ्यावरील वासरांवर शनिवारी रात्री बिबट्या सदृश्य प्राण्याने हल्ला केला. व त्याला फरफटत जवळच्या ऊसाच्या शेतात नेले. सकाळी झोपेतून उठल्यानंतर शेतकरी कचरु काळे यांना गोठ्यात वासरू दिसले नाही. त्यामुळे त्यांनी आसपास शोधाशोध केली असता, ऊसाच्या शेतात कुरतडलेल्या अवस्‍थेत हे वासरू  मिळून आले.

या घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी अभय अटकळ वन विभागाच्या पथकासह घटनास्‍थळी दाखल झाले.  सध्या वनरक्षक के. बी. वाकोदकर, ए. पी. कासारे, एस. के. नाईकवाडे परिसरात या प्राण्याचा शोध घेत आहेत. श्री अटकळ यांनी वन्य प्राण्याच्या ठशाची पाहणी केली. मात्र, पावसामुळे ठशावरून प्राण्याचा अंदाज घेता येत नसल्याने सदर ठशाचे छायाचित्र वाईल्ड लाईफ अधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

सदर ठसे बिबट सदृश्‍य प्राण्याचे असल्याचा त्यांचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे सदर भागात या वन्य प्राण्यावर नजर ठेवण्यासाठी व विभागाचे पथक तैनात करण्यात आले आहे. या घटनेची  बातमी परिसरात पसरली असून सध्या खरीप हंगामाची कामे सुरू असल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण तयार झाले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jalna wild animals attack animals