esakal | अप्पर दुधना मध्यम प्रकल्पात असलेला जेमतेम जलसाठा
sakal

बोलून बातमी शोधा

badnapur

अप्पर दुधना मध्यम प्रकल्पात जेमतेम पाणीसाठा शिल्लक

sakal_logo
By
आनंद इंदानी

बदनापूर : तालुक्यात पाऊस वार्षिक सरासरी गाठण्याच्या उंबरठ्यावर असताना सोमठाणा येथील अप्पर दुधना मध्यम प्रकल्पासह इतर साठवण तलावात अद्याप जलसाठ्यात समाधानकारक वाढ झालेली नाही. एकूणच तालुक्यातील जलस्रोत भरण्यासाठी अद्यापही जोरदार पावसाची गरज आहे.

बदनापूर तालुक्यात मागच्या वर्षी वार्षिक सरासरीला १५० टक्के पाऊस झाला होता. त्यामुळे बदनापूर शहरासह जवळपास १५ गावांची तहान भागविणारा सोमठाणा अप्पर दुधना मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून अगदी मागच्या दिवाळी पर्यंत ओसंडून वाहत होता. तर भाकरवाडी व राजेवाडी साठवण तलाव देखील ‘ओव्हरफ्लो’ झाले होते.

हेही वाचा: सुडाचे राजकारण; बीड शहरातली विकासकामे अडविली

वाल्हा व आन्वी साठवण तलावात देखील जवळपास ९० टक्के जलसाठा साठला होता. एकंदरीत मागच्या वर्षी झालेल्या दमदार पावसाने सर्वच सिंचन प्रकल्प पाण्याने डबडबली होती. त्यामुळे तालुक्यात कुठेही टंचाईची परिस्थिती जाणवली नाही. अगदी उन्हाळ्यात टँकर देखील सुरू करण्याची वेळ आली नाही. शिवाय तलावातील पाण्याच्या पाझराने विहिरींच्या पाणीपातळीत देखील वाढ झाली होती. त्यामुळे साहजिकच रब्बीचा पेरा आणि फळबाग लागवडीचे प्रमाण वाढले होते. मात्र जलसंपन्नतेचा आनंद फार काळ टिकला नाही. वातावरणातील वाढत्या उष्णतेसह तलावातील पाण्यावर डल्ला मारला जात असल्यामुळे अवघ्या काही महिन्यात तलावातील पाणी पातळी कमी होत गेली. अर्थात यंदाच्या हंगामात देखील पावसाने दमदार हजेरी लावली. अद्याप पावसाळा संपायला महिनाभराचा अवधी असताना पावसाने जवळपास वार्षिक सरासरी गाठली आहे.

मात्र असे असताना देखील तालुक्यातील सोमठाणा प्रकल्पासह इतर सर्व सिंचन प्रकल्पातील जलसाठा काही वाढला नाही. सध्या सोमठाणा येथील दुधना अप्पर मध्यम प्रकल्पात केवळ ३२ ते ३३ टक्के जलसाठा शिल्लक आहे. तर इतर साठवण तलावाची कमी - अधिक प्रमाणांत अशीच परिस्थिती आहे. तालुक्यात पाऊस वार्षिक सरासरी गाठत असताना सिंचन प्रकल्पाचा जलसाठा वाढत नसल्याची चिंता आहे. यंदा तालुक्यात वाहुनी स्वरूपाचे पाऊस कमी झाले. त्यामुळे धरणक्षेत्रातील नदी - नाले फारसे वाहून निघाले नाहीत, त्यामुळे पाण्याचा ओघ सिंचन प्रकल्पांपर्यंत पोचला नाही. आगामी उन्हाळ्यातील टंचाईची परिस्थिती दूर होण्यासह विहिरींची पाणी पातळी वाढण्यासाठी सिंचन प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरणे गरजेचे आहे. अर्थात त्यासाठी धरणक्षेत्रात जोरदार पाऊस झाला पाहिजे.

loading image
go to top