esakal | सुडाचे राजकारण; बीड शहरातली विकासकामे अडविली
sakal

बोलून बातमी शोधा

beed

सुडाचे राजकारण; बीड शहरातली विकासकामे अडविली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बीड : शहरातील विकासाची कामे पालिकेमार्फत झाली तर स्वत:ची किंमत कमी होईल, म्हणून स्थानिक आमदार सुडाचे राजकारण करत आहेत. जाणीवपूर्वक विकास कामे आडवीत असल्याचा आरोप नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी केला. शहरात व मतदार संघात माफियागिरी, गुंडगिरी वाढली असून वाळू माफियांचा सुळसुळाट असून याला तेच जबाबदार असल्याचा हल्लाबोलही डॉ. क्षीरसागर यांनी बुधवारी (ता. एक) पत्रकार परिषदेत केला. आम्ही दहा कोटींची कामे केली तर तुम्ही २० कोटींची करून निकोप विकासाची स्पर्धा करा, असे आवाहनही त्यांनी केले. मात्र, सत्तेचा दुरुपयोग करून दलित वस्ती, दलित्तेतर विकास व वैशिष्ट्यपूर्ण कामे व निधी पालकमंत्र्यांच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळविली गेली आहेत. (Beed News)

केवळ बीड, धारुर व गेवराई नगर पालिकेबाबत असा दुजाभाव केला जात आहे. यापूर्वीच्या कोणत्याच पालकमंत्र्यांनी अशी भूमिका घेतली नव्हती. यापूर्वी शहरातील कोणत्याच आमदारांनी पालिकेच्या विकासाला खोडा घातला नाही मात्र विद्यमान आमदारांकडून जाणीवपूर्वक खोडा घालून विकासात आणि मागासवर्गीयांच्या विकासात आडवे येत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. यंत्रणा बदलूनही चार महिन्यांपासून कामे ठप्प असल्याचा आरोप त्यांनी केला. विकास कामे करण्यात पालिकेची यंत्रणा सक्षम आहे. शहरात १३५ कोटी रुपयांच्या कामांसह २०० कोटी रुपयांची अमृत अटल व भुयारी गटार योजनाही पालिकेच्या माध्यमातून अंतिम टप्प्यात असल्याचे डॉ. क्षीरसागर म्हणाले.

हेही वाचा: अन् पुरासोबत शेतकऱ्यांचे स्वप्न वाहून गेले

मात्र, आमदारांकडून पदाचा दुरुपयोग करून नगर पालिकेचा संविधानिक हक्क हिसकावून घेतला जात आहे. शहरातील १६ नवीन डीपी रस्त्यांसाठी ८८ कोटी रुपये मंजूर करून घेतले आहेत. मात्र, शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या विकासकामात अडथळा आणला जात आहे. पालिकेमार्फत ही कामे झाली तर येणाऱ्या निवडणुकीत पुन्हा एकदा आपल्याला जनता मागे फेकेल अशी आमदारांना भिती असल्याने पालकमंत्र्यांच्या माध्यमातून नगरपालिकेला आलेला निधी अडवण्याचा प्रयत्न केले जात आहेत. गरिबांची शेकडो घरकुलांची कामे आमदारांनी अडविल्याचा आरोपही त्यांनी केला. सभापती विनोद मुळूक, नगरसेवक डॉ. योगेश क्षीरसागर, भिमराव वाघचौरे, गणेश वाघमारे आदी उपस्थित होते.

व्हिडिओ दाखवत अखत्यारीतील कामांचे आवाहन

यावेळी शहरातून जाणाऱ्या जालना रोड व नगर रोडवरील खड्ड्यांचे व्हिडिओ चित्रण दाखविण्यात आले. आमदारांकडून बारमाही मंत्र्यांना भेटीचे फोटो टाकले जातात. मग, ही कामे का होत नाहीत, असा सवाल डॉ. योगेश क्षीरसागर यांनी केला. पालिकेच्या कामांत खोडा घालण्याऐवजी स्वत:च्या अखत्यारीतील विकास कामे करा, असे आवाहन त्यांनी केले.

loading image
go to top