
जालना येथील जलसंधारण विभागातर्फे आडगाव गटात वेगवेगळ्या ठिकाणी कोल्हापूरी पध्दतीच्या पाच बंधाऱ्यांची कामे एम. ए. अंभोरे या गुत्तेदारामार्फत करण्यात येत आहेत.
जिंतूर ( जिल्हा परभणी ) : तालुक्यातील आडगाव- बाजार गटातील कोल्हापूरी पध्दतीच्या बंधाऱ्यांची कामे झाली असून यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याची तक्रार गटाच्या सदस्या अरुणा अविनाश काळे यांनी जलसंधारण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांना शुक्रवारी ( ता. पाच ) दिलेल्या केली असून याबाबत वरिष्ठ स्तरावर चौकशी करुन संबंधित गुत्तेदार, अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
जालना येथील जलसंधारण विभागातर्फे आडगाव गटात वेगवेगळ्या ठिकाणी कोल्हापूरी पध्दतीच्या पाच बंधाऱ्यांची कामे एम. ए. अंभोरे या गुत्तेदारामार्फत करण्यात येत आहेत. सदरील कामे निकृष्ट व चुकीच्या पध्दतीने होत आहेत. याबद्दल गटातील शेतकऱ्यांच्या तक्रारीवरुन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी ऑगस्ट २०२० व फेब्रुवारी २०२१ मध्ये कामाची प्रत्यक्ष पाहणी करुन मोजमापे घेतली असता त्यात मोठी तफावत आढळून आल्याने कामाचा पंचनामा केला. त्यानंतर लाभार्थी शेतकऱ्यांनी कार्यकारी अभियंता श्री. कुचे यांची भेट घेऊन चौकशी करण्यासंदर्भात निवेदन दिले. त्यानंतरही अनेकवेळा पाठपुरावा करण्यात आला. परंतु त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नाही, अथवा याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही केल्याचे दिसून नाही. उलट खोटे अहवाल देऊन शेतकऱ्यांची व शासनाची दिशाभूल करत आहेत.
यावरुन संबंधित अधिकारी चौकशीच्या नावाखाली वेळकाढूपणा करत असून उघड उघड होत असलेल्या या भ्रष्टाचाराला खतपाणी घालत असल्याचा आक्षेप निवेदनात घेण्यात आला. निवेदनावर जिल्हा परिषद सदस्या अरुणा काळे, अविनाश काळे व शेतकरी ज्ञानदेव संतराम दाभाडे, तानाजी बाबुराव चव्हाण यांच्या सह्या आहेत.
संपादन- प्रल्हाद कांबळे