जिंतूर : खाजगी शिकवणीवर्ग चालकांकडून विद्यार्थ्यांच्या जीविताशी खेळ : परवानगी नसतांनाही बिनधास्तपणे वर्ग झाले सुरू

राजाभाऊ नगरकर.
Friday, 4 December 2020

कोव्हिड १९ चा वाढता आलेख पाहून शासनाने विद्यार्थ्यांना कोरोना सारख्या महाभयंकर आजारापासून सुरक्षित ठेवण्याकरिता तब्बल आठ महिने शाळा बंद ठेवल्या होत्या.

जिंतूर (जिल्हा परभणी) - कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाची कोणतीही परवानगी नसतांनाही शहरातील खाजगी शिकवणीवर्ग चालकांनी बिनधास्तपणे वर्ग सुरू करून विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ चालू केला असल्याचे  चित्र पहावयास मिळत आहे. विशेष म्हणजे चालक वर्गात शासनाने घालून दिलेल्या मागर्दशक तत्वांची पायमल्ली ही करित असल्याचे निरदर्शनास येत आहे.

कोव्हिड १९ चा वाढता आलेख पाहून शासनाने विद्यार्थ्यांना कोरोना सारख्या महाभयंकर आजारापासून सुरक्षित ठेवण्याकरिता तब्बल आठ महिने शाळा बंद ठेवल्या होत्या. त्यात अलीकडे कांही दिवस 'शाळा बंद पण शिक्षण सुरू' या प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्याची व्यवस्था केली होती.मात्र गरीब व हातावर पोट असलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना हे शिक्षण झेपत नसल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्यादृष्टीने आदर्श नियमावली तयार करून तब्बल आठ महिन्यानंतर म्हणजेच दोन डिसेंबर रोजी शाळांची घंटी वाजली. शाळेची घंटी वाजताच शहरातील खाजगी शिकवणीवर्ग चालकांना ही अचानक जाग आली. एरवी गल्लीबोळात चोरीछुप्पे सुरू असलेल्या खाजगी शिकवणी वर्गाला एकाचवेळी पेव फुटले अन आपल्यालाही परवानगी मिळाल्याचा थाटात शिक्षणाचा व्यवसाय सुरू केला.शिवाय शासनाची कोणतीही परवानगी नसतांनाही विद्यार्थ्यांकडून आर्थिक मलिदा खण्याकरिता खाजगी शिकवणी वर्ग चालकांनी शहरात ठिकठिकाणी बिनधास्तपणे खाजगी शिकवणी वर्ग सुरू केले आहे.  वर्गात ज्ञानार्जनासाठी आलेल्या विद्यार्थ्यां करिता शासनाने खबरदारीचे उपाय म्हणून जी मार्गदर्शक तत्व घालून दिले त्याचीदेखील चालकांकडून पायमल्ली होत आहे. या विदारक चित्रावरून खाजगी शिकवणी वर्ग चालकांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ सुरू केला आहे हे दिसून येते.

हेही वाचा नांदेड : शेतकऱ्यांना 34 लाखांचा गंडा घालणाऱ्या दुकानदारांवर गुन्हा दाखल -

वर्ग चालकांच्या कोरोना तापसणीवर प्रश्न चिन्ह

कोरोना विषाणूपासून विद्यार्थ्यांना सुरक्षित ठेवण्याकरिता शासनाने शाळा सुरु होण्यापूर्वी प्रत्येक शिक्षकाला स्वतःची कोरोना तपासणी करणे बंधनकारक केले आहे. मात्र बिनधास्तपणे सुरू झालेल्या खाजगी शिकवणी चालकांनी स्वतःची कोरोना चाचणी केली अथवा नाही यावर प्रश्न चिन्ह निर्माण झालेले आहे.

गंभीर प्रकाराकडे शिक्षण विभागाचा कानाडोळा

शासनाची कोणतीही परवानगी नसतांनाही सुरू झालेल्या खाजगी शिकवणी चालक विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ करीत आहे. मात्र या गंभीर प्रकारराची चौकशी करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते 'नॉट रीचेबल' होते. यावरून शिक्षण विभाग या गंभीर प्रकाराकडे कानाडोळा करीत असल्याचे निष्पन्न होत आहे.

सोशल मीडियावर वसतिगृहाच्या जाहिरातीचा धुमाकूळ

राज्य सरकारने वसतिगृह सुरू करण्यासंदर्भात कोणतेही आदेश निर्गमित केलेले नसतानाही वसतिगृह चालकांमध्ये प्रवेशासाठी एक प्रकारची स्पर्धा सुरू झाली असून विद्यार्थी व पालकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी वसतिगृह चालक सोशल मीडियावर प्रवेशासाठी जाहिरातीचा धुमाकूळ घालत असल्याचे चित्र आहे.

 

संपादन - प्रल्हाद कांबळे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jintur: Private tutoring operators play with students' lives: Classes started without permission parbhani news