तरुणांना नामांकित कंपन्यांत नोकरीची संधी, एक हजारांपेक्षा अधिक पदे रिक्त

दत्ता देशमुख
Thursday, 29 October 2020

सुशिक्षित बेरोजगार तरुणांना विविध नामांकित कंपन्यांमध्ये १९०२ रिक्त नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.

बीड : जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना विविध नामांकित कंपन्यांमध्ये १९०२ रिक्त नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. कौशल्य विकास रोजगार व औरंगाबादच्या उद्योजकता, विभागीय आयुक्तालयाच्या वतीने ता. एक ते सात नोव्हेंबर दरम्यान ऑनलाईन महारोजगार मेळावा आयोजित केला आहे.

बामुच्या प्र-कुलगुरुपदी श्‍याम शिरसाठ यांची नियुक्ती

मेळाव्यासाठी औरंगाबाद येथील जय बालाजी एन्टरप्रायजेस, अभिजय ऑटो पार्टस प्रा. लि., आकार ऑटो इंडस्ट्रीज लिमिटेड, महावितरण कार्यालय, औरंगाबादचे मुख्य जीवन विमा सल्लागार प्राधिकरण, पुणे येथील चौगुले इंडस्ट्रीज प्रा.लि., प्रथम एज्युकेशन फाउंडेशन, सेक्युरिटी ॲण्ड इंटेलिजन्स सर्विसेस इंडिया लि. गोवा, रक्षा सेक्युरिटी फोर्स, हिंगोली, विराज प्रोफाईल लि. पालघर, श्री. गुरुकृपा इंजिनिअरिंग वर्क्स, उस्मानाबाद, धूत टान्समिशन औरंगाबाद, महिंद्रा स्टील सर्व्हीस लि. पुणे, एनआरबी बेअरिंग, औरंगाबाद, ॲसेसीव्ह एज्युकेशन लि. पुणे व श्री साई रिसर्च लॅब आदी नामांकित उद्योजकांनी १९०२ ऑनलाईन रिक्त पदे अधिसूचित केलेली आहेत.
दहावी, १२ वी, आयटीआय, पदवीधर, पदविका व अभियांत्रिकी पदवीधर, एमबीए आदी पात्रताधारक उमेदवारांना या पदांसाठी संधी मिळू शकते.

सदर मेळाव्यात सहभागी होण्यासाठी या विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या वरील रिक्तपदांना आपल्या एम्पलॉयमेंट नोंदणी असलेल्या उमेदवारांनी युजरआयडी व पासवर्डने लॉगईन होऊन ऑनलाईन अर्ज करावे व ज्यांची नोंदणी नाही त्यांनी नोंदणी करुन अर्ज करावे, असे आवाहन करण्यात आले.रोजगार मेळाव्याच्या कालावधीत दररोज माहिती बघावी असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे उपायुक्त अ. भि. पवार यांनी केले.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Job Opportunity For Youths In Noted Companies