esakal | गावी परतल्याच्या आनंदाने मजूर गहिवरले... 
sakal

बोलून बातमी शोधा

bus

हिंगोली येथील बसस्‍थानकावर सोमवारी रात्री साडेआठ वाजता बावीस मजूर घेवून पारनेर येथून बस दाखल झाली. आतापर्यंत पारनेर येथून तीन बसमध्ये ८० मजूर आले असून या सर्वांची आरोग्य विभागामार्फत तपासणी होत आहे. 

गावी परतल्याच्या आनंदाने मजूर गहिवरले... 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हिंगोली ः लॉकडाउनमुळे बंद असलेली बस जवळपास दोन महिण्याच्या कालावधीनंतर हिंगोलीच्या बसस्‍थानकात सोमवारी (ता.११) आली. आतापर्यंत तीन बसमधून ८० मजूर हिंगोलीत दाखल झाल्याची माहिती आगारप्रमुख श्री. चोतमल यांनी दिली.

हिंगोली जिल्‍ह्यातील अनेक मजुर कामानिमित्त विविध शहरात गेले आहेत. यात बांधकाम, मिल आदी ठिकाणी ते कामासाठी गेले आहेत. मागच्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने लॉकडाउन सुरू झाले तसेच संचारबंदी, सीमाबंदीमुळे एसटीसह खाजगी वाहने रेल्‍वेदेखील बंद झाल्याने कामासाठी गेलेले मजूर अडकून पडले आहेत. या मजुरांची कामे बंद झाल्याने त्याच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. यातील काही मजुरांनी पायपीट करीत गाव गाठले. मात्र, काहीजण आहे त्‍या ठिकाणीच थांबले होते. 

हेही वाचा - मोंढा गजबजला हळद, हरभऱ्याची आवक वाढल्याने...

अडकलेल्या मजुरांसाठी बससोडण्याची व्यवस्‍था
अडकलेल्या मजुरांसाठी बससोडण्याची व्यवस्‍था राज्य परिवहन महामंडळाने केली आहे. त्‍यात नोंदणी करून बसव्यवस्‍था करण्यात आली. दरम्‍यान, रविवार व सोमवार अशा दोन दिवसात हिंगोली बसस्‍थानकावर अहमदनगर जिल्‍ह्यातील पारनेर येथून तीन बस आल्या आहेत. यात जवळपास ८० मजूर हिंगोलीत दाखल झाले आहेत. 

हेही वाचा - पैशासाठी जीव धोक्यात...

बसस्‍थानकावर महामंडळासह पोलिस, आरोग्य कर्मचारी
सोमवारी रात्री साडेआठ वाजता आलेल्या बसमध्ये २२ मजुरांचा समावेश असल्याची माहिती आगारप्रमुख श्री.चोतमल यांनी दिली आहे. हे मजूर जिल्‍ह्यातील इसापुर रमना, दुर्गसावंगी, पेडगाव येथील असल्याचे सांगण्यात आले. या वेळी बसस्‍थानकावर एसटी महामंडळाचे कर्मचाऱ्यांसह पोलिस प्रशासन व आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्‍थित होते. या सर्व कर्मचाऱ्यांची आरोग्य विभागातर्फे तपासणी करण्यात येत आहे. 

कळमनुरी तालुक्‍यातील एक हजार ११६ नागरिक गावी परतले
कळमनुरी ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील कामासाठी स्थलांतर केलेले सहा हजार ५८२ मजूर कामगार व नागरिक आपल्या मूळ गावी परतले असून या सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांना १४ दिवस होम क्‍वारंटाइन करण्यात आले आहे. या महिन्याच्या सुरवातीच्या दहा दिवसांत एक हजार ११६ नागरिक गावी परतले आहेत. यात बाळापूर ग्रामीण रुग्णालयांतर्गत १२०४, डोंगरकडा आरोग्य केंद्र ९७५, मसोड १३३६, पोतरा १०८०, रामेश्वर ९४९, वाकोडी १०७१, असे एकूण सहा हजार ५८२ मजूर १५ मार्च ते दहा मे या कालावधीत गावी परतल्याची नोंद घेण्यात आली. मार्च महिन्यात चार हजार २६८ नागरिक गावी परतले, तर एप्रिल महिन्यात १३५३ नागरिक आपल्या गावी परत आले. मे महिन्याच्या दहा तारखेपर्यंत यामध्ये एक हजार ११६ नागरिकांची भर पडली आहे.

loading image
go to top