मोंढा गजबजला हळद, हरभऱ्याची आवक वाढल्याने...  

राजेश दारव्हेकर
Tuesday, 12 May 2020

हिंगोली ः येथील मोंढयात सोमवारी दिवसभरात तीन हजार हळदीच्या पोत्यांची आवक झाली होती. त्यास चार हजार पाचशे ते पाच हजार दोनशे रुपये क्‍विंटलचा भाव मिळाला. 

हिंगोली ः लॉकडाउनमध्ये शेतमाल विक्रीसाठी मुभा देण्यात आल्याने येथील मोंढ्यात मागच्या काही दिवसांपासून हळदीची आवक सुरू झाली आहे. सोमवारी (ता.११) दिवसभरात तीन हजार पोत्यांची आवक झाली होती. मात्र, हळदीचे भाव चार हजार ५०० ते पाच हजार दोनशे रुपये क्‍विंटलप्रमाणे होते.

हिंगोलीतील हळदीचे मार्केट सर्वदूर परिचीत आहे. दरवर्षी येथे हिंगोलीसह इतर जिल्‍ह्यातूनदेखील हळद विक्रीसाठी येते. यावर्षीही दुसऱ्या जिल्‍ह्यातील शेतकरी हळद घेवून आले होते. मात्र, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे काही दिवस मोंढा बंद होता. त्‍यानंतर शासनाने खरीप हंगाम जवळ येत असल्याने शेतमाल खरेदी विक्रीस मुभा दिली.

हेही वाचा -  Video : शंक्या...! काहीही व्हायलय बे हे....; अभिनेता संकर्षण यांची परभणी तडका कविता

वाहनांच्या लांबच लांब रांगा
हिंगोली येथील मोंढ्यात हळदीची आवक सुरू झाली. यासाठी शासनाने दिलेले नियम व अटी पाळत येथे हळदीची खरेदी सुरू झाली. यामुळे भल्या पहाटेपासून शेतकरी वाहनातून हळद घेवून येत असल्याने या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. दरम्‍यान, सोमवारी दिवसभरात तीन हजार पोत्यांची हळदीची आवक झाली होती. मात्र चार हजार ५०० ते पाच हजार दोनशे रुपये क्‍विंटलप्रमाणे त्‍याची खरेदी करण्यात आल्याने शेतकऱ्यातून नाराजी व्यक्‍त होत होती. 

हेही वाचा - हिंगोलीकरांना दिलासा, १५ जण कोरोनामुक्‍त
 
हळद उत्‍पादकातून नाराजी
हळदीची प्रक्रिया करण्यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागत असल्याचे गणेश खंडागळे या शेतकऱ्यांनी सांगितले. लागवड, खत, निंदणी, काढणी, शिजविणे, वाळत घालणे व नंतर ढोलमधून काढणी अशी प्रक्रिया यासाठी करावी लागते. त्‍यासाठी खर्चदेखील भरपूर येतो. मात्र, त्‍याप्रमाणात भाव मिळत नसल्याने हळद उत्‍पादकातून नाराजी व्यक्‍त होत आहे. मात्र, सध्या खरीपाचा हंगाम जवळ आल्याने खते, बियाणे व औषधी खरेदीसाठी पैशाची गरज असल्याने हळदीची विक्री करून हे साहित्य खरेदी करावे लागत असल्याने त्‍याची विक्री करावी लागत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

मंगळवारी हरभऱ्याची खरेदी 
मंगळवारी (ता.१२) मोंढ्यात हळदीची खरेदी बंद होती. आज सकाळपासून हरभरा घेवून शेतकरी येथे आले होते. आज दुपारपर्यंत तीनशे पोत्याची आवक झाली होती. चार हजार ५०० ते पाच हजार तीनशे रुपये क्‍विंटलप्रमाणे त्‍याची खरेदी करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: With The Increase In Turmeric And Gram, The Price Has Gone Up, hingoli news