कळमनुरी : प्रधानमंत्री शहरी घरकुल योजनेसाठी एक कोटी 14 लाखाचा निधी प्राप्त

राजेश दारव्हेकर
Friday, 9 October 2020

खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; घरकुलाचा  केंद्रसरकारचा १ कोटी १४ लाखाचा निधी प्राप्त

हिंगोली : कळमनुरी नगर परिषद अंतर्गत प्रधानमंत्री शहरी घरकुल आवास योजनेचा रखडलेला केंद्राचा एक कोटी १४ लाखाचा निधी नुकताच प्राप्त झाला आहे. खासदार हेमंत पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारचा निधी मंजूर झाला असून लवकरच या निधीचे वाटप लाभार्थ्यांना करण्यात येणार आहे.  

कळमनुरी नगरपरिषद अंतर्गत प्रधानमंत्री घरकुल आवास  योजनेचा निधी मागील  बऱ्याच दिवसापासून रखडलेला होता. यामुळे सर्व सामान्य नागरिकांचे घराचे स्वप्न अर्धवट राहिले होते. नगरपरिषद अंतर्गत घटक क्र.४ अन्वये १७८ लाभार्थ्यांचा डी. पी. आर डिसेंबर २०१८ मध्ये मंजूर करण्यात आला होता, याकरिता ७४ लाख २० हजाराचा निधी लाभार्थ्यांना वाटप करण्यात येऊन घरकुलाचे काम सुरु झाले होते. परंतु मागील काही दिवसापासून निधी रखडलेला होता. 

हेही वाचानांदेड : जिल्ह्यात बिबट्याचा संचार, हल्ल्यात वासरु ठार, शेतकरी भयभीत

रखडलेला निधी तात्काळ मंजूर

याबाबत खासदार हेमंत पाटील यांनी राज्य आणि केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करून मागील महिन्यात राज्य सरकाराचा एक कोटी सहा लाखाचा निधी मंजूर करून आणला होता. आणि उर्वरित केंद्राच्या निधीसाठी केंद्रीय गृहनिर्माण आणि कामकाज मंत्री हरदीपसिंग पुरी यांची भेट घेऊन रखडलेला निधी मंजूर करण्याबाबत निवेदन दिले होते. सोबतच मतदार संघातील सहा नगरपरिषद आणि पाच नगरपंचायत अंतर्गत घरकुलांचा निधी मंजूर करावा अशी ही मागणी केली होती. या मागणीची केंद्रसरकारने दखल घेत केंद्र सरकारचा रखडलेला निधी तात्काळ मंजूर केला आणि एक कोटी १४ लाखाचा निधी कळमनुरी नगरपरिषदेला प्राप्त झाला.

येथे क्लिक करा बांगडी विक्रेत्याच्या मुलीचे भन्नाट यश : क्लास न लावता घरी राहून अभ्यास करत मिळवला आयआयटीत प्रवेश -

कळमनुरी शहरातील जनतेचे घराचे स्वप्न पूर्ण

लवकरच निधीचे वाटप लाभार्थ्यांना करण्यात येणार आहे. घरकुल निधीसाठी खासदार हेमंत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, म्हाडा गृहनिर्माण संस्था यांना कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात सातत्याने पाठपुरावा केला होता. या सर्व बाबीचे फलित म्हणून शहरातील घरकुलांचा रखडलेला निधी प्राप्त झाला आहे. प्रत्येक गरीब कुटुंबातील व्यक्तीच स्वप्न असते की आपले स्वतःचे एक घर असावे या स्वप्नपूर्तीसाठी खासदार हेमंत पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा करून कळमनुरी शहरातील जनतेचे घराचे स्वप्न पूर्ण केले आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kalamanuri: A deduction of Rs 14 lakh has been received for Pradhan Mantri Shahri Gharkul Yojana hingoli news