कळंब तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा रणसंग्राम रंगणार!

दिलीप गंभीरे
Sunday, 6 December 2020

कळंब तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा रणसंग्राम येत्या दोन महिन्यांत रंगणार आहे. या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण १५ डिसेंबरपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे.

कळंब (जि.उस्मानाबाद) : कळंब तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा रणसंग्राम येत्या दोन महिन्यांत रंगणार आहे. या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण १५ डिसेंबरपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इटकुर, येरमळा, मंगरूळ,नायगावसह ५९ ग्रामपंचायतींच्या राजकीय पदाधिकाऱ्याचे सरपंच आरक्षणाकडे लक्ष लागले आहे. तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतींची पंचवार्षिक मुदत सप्टेंबर महिन्यात संपली आहे. मात्र कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर निवडणुका अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आल्या. दरम्यान मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर शासनाने प्रशासकाच्या नियुक्त्या केल्या. ग्रामपंचायतीअंतर्गत नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी १५ व्या वित्त आयोग निधीतून लाखो रुपयांचा निधी प्राप्त झालेला अध्यापही अखर्चित आहे.

१५ डिसेंबरपर्यत होणार सरपंचपदाचे आरक्षण जाहीर
शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास घाडगे-पाटील व तुळजापूरचे भाजपचे आमदार रणाजगजितसिंह पाटील, काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री मधुकर चव्हाण यांच्या समर्थकांमध्ये काट्याच्या लढती होतील. तालुक्यातील ग्रामपंचायतींवर सत्ता काबीज ठेवण्यासाठी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस विरुद्ध भाजप असा सामना पाहावयास मिळतो की काय अशी शक्यता आहे. आपल्याच पक्षाच्या ताब्यात ग्रापंचायत ताब्यात ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांसह राजकीय लोकप्रतिनिधींमध्ये चढाओढ लागणार आहे. सत्तेचा बालेकिल्ला राखण्यासाठी आतापासून गावपुढाऱ्यांना वेध लागले आहे. त्यामुळे आता प्रशासक जाऊन गावाला सरपंच मिळणार असून तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतींच्या प्रारूप याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. सात डिसेंबरपर्यंत हरकती घेण्याची मुदत आहे. अंतिम याद्या प्रसिद्ध होणार असून अद्यापपर्यत सरपंचपदाचे आरक्षण जाहीर करण्याची तारीख मिळाली नसली तरी १५ डिसेंबरपर्यंत सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होण्याची शक्यता आहे.

सरपंचपदाच्या आरक्षणाकडे लक्ष
सप्टेंबरमध्ये तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मुदत संपली आहे. निवडणूक घेण्यासाठी निवडणूक विभागाकडून जोरदार तयारी सुरू आहे. प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आली आहे. लवकरच अंतिम यादी प्रसिद्ध होईल. सरपंचपदाचे आरक्षण कधी जाहीर करायचे याबाबत वरिष्ठ प्रशासकीयस्तरावरून तारीख मिळालेली नाही. मात्र एक दोन दिवसांत तारीख मिळेल. १५ डिसेंबरपर्यंत सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होणार असल्याने आरक्षणाकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kalamb Block's Fifty Nine Grampanchayats Election To Be Held