Sugarcane Workers: दुष्काळी परिस्थितीने शेती उजाड; संसाराचे बिऱ्हाड घेऊन पश्चिम महाराष्ट्राकडे रवाना

Kalamb Drought, Sugarcane Workers, Farmer Migration : यंदाच्या दुष्काळामुळे पिकांचे उत्पादन घटल्याने शेतकरी व शेतमजूर कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
Drought-hit farmer and farm labourer families from Kalamb head towards Western Maharashtra for seasonal sugarcane harvesting work.

Drought-hit farmer and farm labourer families from Kalamb head towards Western Maharashtra for seasonal sugarcane harvesting work.

esakal

Updated on: 

कळंब,: यंदाच्या दुष्काळाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. क्विंटलभर उत्पादनाची अपेक्षा असताना किलोभरही धान्य हाती पडत नसल्याने अनेक शेतकरी व शेतमजूर कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाच जणांच्या कुटुंबाचा संसार कसा चालवायचा, या विवंचनेतून अखेर अनेक अल्पभूधारक व शेतमजूर कुटुंबांनी ऊसतोडणीसाठी पश्चिम महाराष्ट्राची वाट धरली आहे. कळंब-येरमाळा पालखी मार्गावरून ट्रॅक्टरमध्ये संसाराचे बिऱ्हाड घेऊन हजारो ‘कोयते’ उसाच्या फडाकडे रवाना होत असल्याचे चित्र दिसत आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाल्याने मराठवाडा आणि विदर्भातील ऊसतोड कामगारांची पावले पुन्हा कारखान्यांकडे वळली आहेत. एका बाजूला दुष्काळाने करपलेली शेती, तर दुसऱ्या बाजूला पोटाची खळगी भरण्यासाठी करावे लागणारे स्थलांतर, असे विदारक चित्र ग्रामीण भागात निर्माण झाले आहे. पावसाचा लांबलेला खंड, पिकांचे नुकसान आणि उत्पादनातील मोठी घट यामुळे शेतकरी कुटुंबांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

वर्षभर कष्ट करूनही घरात धान्याचा पुरेसा साठा होत नसल्याने दैनंदिन खर्च भागविण्यासाठी मजुरीवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. अनेक शेतकरी व शेतमजूर कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे शेतीतून उत्पन्नाची आशा मावळताच चार पैसे मिळविण्यासाठी ऊसतोडणीचा मार्ग स्वीकारावा लागत आहे.

अनेक कामगार कुटुंबांचे बिऱ्हाड घेऊन स्थलांतर

ऊसतोड कामगार कुटुंबे कपडे, भांडी, संसारोपयोगी साहित्य आणि लहान मुलांसह ट्रॅक्टरमधून रवाना होत आहेत. अनेकांना हंगाम सुरू होण्यापूर्वी ठेकेदारांकडून आगाऊ रक्कम घ्यावी लागते. शेतीतून उत्पन्न नाही, स्थानिक पातळीवर रोजगाराची हमी नाही आणि घरखर्चाचा भार कायम असल्याने उधारीवरच संसाराचा गाडा सुरू असतो. हंगामातील मजुरीतून ही उधारी फेडली जाते. त्यामुळे ऊसतोडणी हा केवळ रोजगार नसून वर्षभराच्या जगण्याचा आधार बनला आहे.

ऊसतोडणीच्या कामात नवरा-बायकोच्या जोडीला ‘कोयता’ म्हटले जाते. यंदा दुष्काळामुळे गावात रोजगाराची दारे बंद झाल्याने हजारो कोयते पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात दाखल होत आहेत. ‘यंदा दुष्काळाने शेतात काहीच उरले नाही. वर्षभर कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवर करायचा; पण यंदा घर चालवणेही कठीण झाले आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी गाव सोडून ऊसतोडणीला जावे लागत आहे.

- सुग्रीव कोरडे, आसनगाव (जि. जालना)

दरवर्षी शेतातून क्विंटलभर उत्पादन निघायचे; यंदा किलोभरही धड निघाले नाही. सरकारी मदत कधी मिळेल, याची शाश्वती नसल्याने कुटुंबाच्या पोटासाठी ऊसतोडणीला जाण्याशिवाय पर्याय नाही. शेती असूनही मजुरी करण्याची वेळ दुष्काळाने आणली आहे.

- मनोहर देवरे, करंजी (जि. वाशीम)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com