esakal | कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिव निवडीत ‘अर्थ’कारण की ‘राज’कारण?
sakal

बोलून बातमी शोधा

Osmanabad

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिव निवडीत ‘अर्थ’कारण की ‘राज’कारण?

sakal_logo
By
सयाजी शेळके

उस्मानाबाद: कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिव निवडीवरून सत्ताधारी संचालकांमध्ये गटात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. जिल्हा उपनिबंधकांनी निवडीची प्रक्रिया फेटाळून लावल्याने यावर पडदा पडल्याचे बोलले जात आहे. कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळावर सध्या आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या गटाचे वर्चस्व आहे. त्यांच्याच गटाचे रामहारी शिंदे यांची सभापती पदावर वर्णी लागली आहे.

दरम्यान, समितीचे सचिवपद रिक्त आहे. यावर एकाची वर्णी लावण्यासाठी संचालकांतील काही जणांचे मनसुबे होते. नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत विरोधी गटाच्या सदस्यांना हाताशी धरून सत्ताधारी गटातील काही सदस्यांनी सचिवपदाची भरती करण्याचा ठराव घेतला. सत्ताधारी गटातील अन्य काही सदस्यांना याची माहिती नव्हती. त्यामुळे या ठरावावरून काही सदस्यांमध्ये चांगलीच चलबिचल झाली. ऐनवेळी असा ठराव घेतल्याने काही सदस्यांनी याबाबत विरोध दर्शविला. त्यात विरोधी सदस्यही ठरावाच्या बाजूने असल्याने सत्ताधारी गटातील काही सदस्य चांगलेच गोंधळून गेले. त्यांनी थेट आपल्या नेत्याशी संपर्क केला. त्यामुळे गोंधळ अधिकच वाढला.

हेही वाचा: कौतुकास्पद! औरंगाबादच्या आसावरीची जागतिक पातळीवर भरारी

परिणामी, सत्ताधारी गटातील उर्वरित सदस्यांनी थेट जिल्हा उपनिबंधक कार्यालय गाठले. त्यांनी या ठरावाबाबत आपल्याला माहिती नाही. त्यामुळे आमचा याला विरोध आहे. असे तोंडी म्हणणे सांगितले. त्याचवेळी उपनिबंधक कार्यालयातून हा ठराव मंजूर होणार नसल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यामुळे सत्ताधारी गटातील अन्य सदस्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. दरम्यान, घडलेल्या घटनेबाबत सत्ताधारी गटात चांगलीच उलटसुलट चर्चा सुरू झाली. एवढा तडकाफडकी ठराव कशामुळे घेतला. सत्ताधारी गटातील एका गटाने विरोधकांशी का जवळीक साधली. नेमके यात ‘अर्थ’कारण होते की ‘राज’कारण होते, याची चर्चा तालुक्याच्या राजकारणात चांगलीच रंगली आहे. दरम्यान, ठरावाला मान्यता मिळणार नाही. हे समजल्याने सत्ताधाऱ्यांमधील एका गटाचा डाव फसल्याची चर्चा बाजारसमितीच्या आवारात चवीने चर्चली जात आहे.

बाजार समितीच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ संपत आहे. याबाबत न्यायालयाने तसे निर्देश दिले आहेत. त्यामुळे सचिव निवडीची प्रक्रिया संध्याच्या संचालक मंडळाला घेता येत नाही. त्यामुळे आम्ही त्या प्रक्रियेला स्थगिती दिली आहे.
- विकास देशमुख, जिल्हा उपनिबंधक, उस्मानाबाद

loading image