

Kalamnuri LPG Shortage
esakal
कळमनुरी: शहर व तालुक्यात मागणीच्या तुलनेत घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा कमी झाल्यामुळे घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र आहे. यामुळे नागरिकांना गॅस मिळविण्यासाठी मोठी धावपळ करावी लागत असून ग्राहकांची गैरसोय होत आहे. दुसऱ्या बाजूला सिलिंडरसाठी कंपनीकडून नोंदणी करण्याकरिता देण्यात आलेल्या मोबाइल व व्हॉट्सॲप नंबरवरही नोंदणी प्रक्रिया होत नसल्यामुळे ग्राहकांची मोठी अडचण झाली आहे.
येथील गॅस एजन्सीवर अमरावती धनज येथून इंडियन ऑइल कंपनीकडून दररोज ३४२ सिलिंडरचा पुरवठा करण्यात येत होता. मात्र, गॅस सिलिंडरबाबत पसरलेली अफवा व घरात एक सिलिंडर शिल्लक असतानाही अतिरिक्त सिलिंडर उपलब्ध करून घेण्यासाठी एजन्सीवर नागरिकांनी केलेली गर्दी पाहता मागील चार ते पाच दिवसांत ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर सिलिंडर उचलण्यात आले आहेत.