esakal | करुणा शर्मांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; स्वत:च मांडली कोर्टात बाजू
sakal

बोलून बातमी शोधा

करुणा शर्मा

वकील वेळेवर न पोचल्याने करुणा शर्मा यांनीच न्यायालयात स्वत:ची बाजू मांडली

करुणा शर्मांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; स्वत:च मांडली बाजू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बीड/अंबाजोगाई: अॅट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हा नोंद झालेल्या करुणा शर्मा (karuna sharma) यांना सोमवारी (ता. सहा) अंबाजोगाईच्या सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने शर्मा यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. या प्रकरणात वकील वेळेवर न पोचल्याने करुणा शर्मा यांनीच न्यायालयात स्वत:ची बाजू मांडली. तर, अरुण मोरे यास एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. परळीत येऊन पत्रकार परिषद घेऊन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह अनेकांचे खुलासे करणार असल्याचे करुणा शर्मा यांनी फेसबुकवरुन जाहीर केले होते. त्यानुसार त्या रविवारी (ता. पाच) परळीत पोचल्या. मात्र, मुंडे समर्थकांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी दिली.

दरम्यान, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या तालुका संयोगीनी विशाखा घाडगे यांनी ‘जातीवाचक शिवीगाळ का करतेस’ असा जाब विचारल्याने करुणा शर्मा यांनी बेबी छोटूमियां तांबोळी हिला खाली पाडून जखमी केले. तर, अरुण दत्तात्रय मोरे याने चाकूने पोटावर वार केल्याची फिर्याद घाडगे यांनी दिली. यावरुन करुणा शर्मा व दत्तात्रय मोरे या दोघांवर अॅट्रॉसिटीसह जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद झाला. यावरुन परळी पोलिसांनी दोघांना अटक केली. सोमवारी अंबाजोगाई येथील अप्पर जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीमती एस. स. सापतनेकर यांच्यासमोर शर्मा व मोरे यांना हजर करण्यात आले. शर्मा यांचे वकिल वेळेवर पोचू शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी न्यायालयासमोर स्वत:च बाजू मांडली. तर, सरकारी पक्षातर्फे अशोक कुलकर्णी यांनी काम पाहीले. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकूण न्यायालयाने शर्मा यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. तर, मोरे यास एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

हेही वाचा: Karuna Sharma: करुणा शर्मा यांना न्यायालयीन कोठडी

दरम्यान, शर्मा यांच्या वाहनाच्या डिक्कीत पोलिस झडतीत पिस्तुल आढळले होते. मात्र, वाहनाची डिक्की उघडून कोणीतरी काही तरी ठेवत असल्याचा व्हिडीओ सायंकाळी सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. याबाबत वाहन चालक मोरे याच्यावर गुन्हा नोंद झाल्याची माहिती पोलिस अधीक्षक राजा रामास्वामी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. डिक्की उघडून काही तरी ठेवले जात असल्याच्या व्हिडीओची चौकशी केली जात आहे असेही त्यांनी सांगीतले.

loading image
go to top