भरपूर पाणी आले, भराव फुटताच गेले... 

अरुण ठोंबरे
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

केदारखेड्याचा बंधारा पुन्हा "जैसे थे'कडे... 

केदारखेडा (जि.जालना) - भोकरदन तालुक्‍यातील केदारखेडा येथील गिरिजा-पूर्णा पात्रावरील बंधाऱ्यात दरवाजे बसविल्यानंतर उगम क्षेत्रातील पावसामुळे चांगला पाणीसाठा झाला. आधीच्या दुष्काळामुळे ग्रामस्थांमध्येही समाधान होते; मात्र परतीच्या पावसामुळे पूरस्थिती उद्‌भवली आणि भरावच वाहून गेल्याने बंधाऱ्यांची पुन्हा "जैसे थे'कडे वाटचाल सुरू झाली आहे. 

केदारखेडा परिसरात पावसाळ्यात केवळ रिमझिम पाऊस झालेला होता. त्यातच दुष्काळामुळे येथील गिरिजा-पूर्णा पात्रही कोरडेठाक राहिले. नदीवरील कोल्हापुरी बंधारा पूर्ण क्षमतेने भरण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले होते; मात्र उगम क्षेत्रात मधल्या काळात पाऊस पडला, त्यातच परतीच्या पावसाने नदीपात्रात पाणी येऊ लागले. प्रशासनाने ग्रामस्थांचा दुष्काळाचा अनुभव लक्षात घेता बंधाऱ्यावर दरवाजेही बसविले; मात्र परतीच्या पावसाचा जोर वाढल्यानंतर मात्र बंधाऱ्यावरून पाणी वाहू लागले. त्यातच पाण्याच्या वाढत्या प्रवाहाच्यामुळे बंधाऱ्याचा भराव वाहून गेला. परिणामी बंधाऱ्यातील पाणी वाहून गेले. शिवाय बंधाऱ्याजवळील नसीम बेग मिर्झा, अण्णा तांबडे, पंडित तांबडे, अंबादास मगर आदी शेतकऱ्यांची शेतजमीनही वाहून गेली.

आता बंधाऱ्यात जेमतेम पाणी साचलेले आहे. आता पावसाने उघडीप दिलेली आहे. पुढील काळात बंधाऱ्याजवळील भराव व्यवस्थित करण्यासाठी प्रशासनाकडून हालचाली होण्याची शक्‍यता आहे. त्यानंतर बंधाऱ्यात पाणी साचण्यास मदत होईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kedarkheda dam affected